भाजपा आणि त्यांच्या पंटर्सनी खोटेपणाचा कळस गाठला; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 08:18 AM2022-02-21T08:18:36+5:302022-02-21T08:19:47+5:30

दाऊदला पाकिस्तानचे कवच आहे व ते राहणार, पण हिंदुस्थानचे सरकार ते कवच का तोडू शकले नाही? असा टोला शिवसेनेने मोदी सरकारला लगावला आहे.

Shiv Sena's strong attack on BJP and Modi Government over Terriorst Issue, Dawood Issue | भाजपा आणि त्यांच्या पंटर्सनी खोटेपणाचा कळस गाठला; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

भाजपा आणि त्यांच्या पंटर्सनी खोटेपणाचा कळस गाठला; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

Next

मुंबई - ‘पुलवामा’चे लष्करी हत्याकांड कोणी घडवले? त्यात तर आपल्याच सुरक्षा यंत्रणेतील रहस्यमय चुका दिसतात. लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले आहे ते कोणाच्या दुबळेपणामुळे? त्यांच्यावर हल्ला करायचे सोडून मुंबईतले टिनपाट भाजप दलाल राजकीय विरोधकांवर हल्ले करत आहेत व अशा हल्लेखोरांना केंद्र सरकार सुरक्षा कवच देत आहे. महागाई, बेरोजगारी, चीनचा हल्ला व कश्मीरातील सैनिकांचे बलिदान यावर कोणी बोलू नये, यासाठी सुरू असलेले हे डावपेच राष्ट्राला खोल अंधाऱ्या गुहेत ढकलत आहेत अशा शब्दात शिवसेनेने(Shivsena) सामना अग्रलेखातून भाजपावर(BJP) निशाणा साधला.

पंजाबातील निवडणुकांत आजही खलिस्तानवर चर्चा होते. सत्ताधारी व राजकारणी धडधडीत खोटं बोलतात. महाराष्ट्रातही भाजपा व त्यांच्या पंटर्सनी खोटेपणाचा कळस गाठला आहे. सरकारला काम करू द्यायचे नाही व बदनामीच्या मोहिमा चालवायच्या. महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांना केंद्र सरकारने संरक्षण द्यायचे. महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरूच आहे व त्यात सामान्य जनतेला अजिबात रस नसल्याचे बोलले जात आहे. राज्यात व देशात प्रश्नांची कमी नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी लोकांनी सरकारे निवडून दिली आहेत हे कोणीतरी दिल्लीत मोदींना व महाराष्ट्रात भाजप पुढाऱ्यांना सांगण्याची वेळ आली आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

देशाचा कारभार सोडून पंतप्रधान व गृहमंत्री चार-पाच राज्यांच्या विधानसभा प्रचारात गुंतून पडले आहेत. बेफाम आरोपांचा चिखल तुडवीत आणि उडवीत आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांवर विधानसभा प्रचाराची धुरा दिली आहे. नेहमीप्रमाणेच केंद्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपुरात, उत्तराखंडात अडकून पडले.

अशातच कश्मीरातील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला असून त्यात उत्तर प्रदेशमधील संतोष यादव आणि महाराष्ट्राचा सुपुत्र रोमित चव्हाण असे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दुःखद व तितकेच संतापजनक आहे. देशातील अनेक भागांत दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.

एनआयएची म्हणे अशी माहिती आहे की, मुंबई-दिल्लीतील अनेक राजकीय नेते व शहरे दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर आहेत. आता दाऊदच्या निशाण्यावर हिंदुस्थानसारखा मोठा देश आणखी किती काळ असणार ते ठरवायला हवे. दाऊद पाकिस्तानात आहे व त्यास फरफटत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे.

दाऊदला पाकिस्तानचे कवच आहे व ते राहणार, पण हिंदुस्थानचे सरकार ते कवच का तोडू शकले नाही? दाऊद हिंदुस्थानवर हल्ला करीत असल्याच्या ऊठसूट दिल्या जाणाऱ्या बातम्या हिंदुस्थानची बेअब्रू करणाऱ्या आहेत. दाऊद गँगचे कंबरडे मुंबई पोलिसांनी कधीच मोडले आहे.

महाराष्ट्राचे पोलीस असे दाऊदी हल्ले उद्ध्वस्त करण्यास समर्थ आहेत, पण पाकिस्तानचे नरडे दाबण्याची ताकद दिल्ली सरकारमध्ये आहे काय? अहमदाबाद येथे जुलै 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील 38 आरोपींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सामुदायिक फाशी ठोठावली, पण त्या बॉम्बस्फोटांतील प्रमुख आरोपींना पकडून त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम सगळय़ात आधी मुंबई पोलिसांनीच केले आहे.

त्यामुळे दाऊद वगैरेंचे काय करायचे ते पाहता येईल. दिल्लीतील सरकार जागेवर आहे काय? हाच खरा प्रश्न आहे. सरकार जागेवर नाही. सदैव निवडणूक प्रचारात व विरोधी पक्षाला त्रास देण्याच्या राष्ट्रकार्यात गुंतलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा उघड्यावर पडली आहे.

तिकडे कश्मीरात आमचे जवान शहीद होत आहेत. दाऊद दिल्ली-मुंबईवर हल्ला करण्याच्या योजना आखत आहे. हे सर्व प्रकार कमजोर केंद्र सरकारची लक्षणे आहेत. देशात ‘हिजाब’वरून मारामाऱ्या सुरू आहेत, पण दाऊद हल्ले करणार यावर फक्त इशारे देण्याचे काम सुरू आहे.

दाऊद हल्ले करणार म्हणजे पाकिस्तान हिंदुस्थानची कुरापत काढणार, हा त्यामागचा सरळ अर्थ आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात आपले कुलभूषण जाधव खितपत पडले आहेत. त्यांचे पुढे काय होणार, यावर सध्या कोणीच बोलत नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात काय सांगावे, तर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सत्तेवर आली तर अतिरेकी व आतंकवादाचा पुरवठा वाढेल. म्हणजे या देशात नोंदणी झालेला एक राजकीय पक्ष देशात आतंकवादास खतपाणी घालत आहे. मग मोदींचे सरकार व गृहमंत्री इतकी वर्षे हा आतंकवादाचा पुरवठा डोळे उघडे ठेवून का पाहत आहेत?

निवडणुका आल्या की, ही मंडळी आपल्या पेटाऱ्यातून दाऊदचा नागोबा बाहेर काढतात व आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात. हे आता नेहमीचेच झाले. पाकिस्तानात संपलेला दाऊद आपल्याकडील तपास यंत्रणा व राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिवंत ठेवला आहे. दाऊद वगैरे टोळय़ांत आता काही घडवायचा दम उरलेला नाही.

Web Title: Shiv Sena's strong attack on BJP and Modi Government over Terriorst Issue, Dawood Issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.