शिवसेनेच्या हाकेला साथ देणार- हार्दिक पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2017 11:01 PM2017-02-07T23:01:54+5:302017-02-07T23:01:54+5:30
शिवसेनेला माझी गरज भासेल तेव्हा त्यांच्या हाकेला मी साथ देणार, असे शिवसेनेचे नाव न घेता ठाम प्रतिपादन गुजरातचे धडाडीचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी केले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लढाई सत्याची आणि न्यायाची होती. मी त्यांना कधी पाहिले नसले तरी त्यांचा मी फॅन असून, ज्यावेळी शिवसेनेला माझी गरज भासेल तेव्हा त्यांच्या हाकेला मी साथ देणार, असे शिवसेनेचे नाव न घेता ठाम प्रतिपादन गुजरातचे धडाडीचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी केले. गोरेगाव पश्चिम येथील टोपीवाला मार्केटजवळील स्टर्लिंग हॉलमध्ये पाटीदार समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पाटीदार समाजाचे नेते उपस्थित होते.
यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. गुजरातमधील पटेल आणि पाटीदार जनतेवर अन्याय केला जात असून, नोटाबंदीमुळे लोकांचे मोठे हाल झाले आहेत. माझी लढाई समाज बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी आहे. आपण लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या न्याय व हक्काच्या लढाईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याची त्यांनी सांगितले. तुमचे हित जाणणारा पक्ष तो आपला पक्ष असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आपण सॉफिटेल हॉटेलमध्ये उतरलो होतो.
मात्र गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला या हॉटेलमधील खोली खाली करण्याचे सांगण्यात आले. आपल्या भाषणात सुभाष देसाई म्हणाले की, हार्दिक पटेलचे विचार प्रगल्भ असून तो भविष्यात बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आपले विश्व निर्माण करेल. यावेळी शिवसेनाप्रमुखांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता दिलेला पाठिंबा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अडचणीच्या वेळी शिवसेनाप्रमुखांनी केलेले मोलाचे सहकार्य याची आठवण करून दिली. मात्र अच्छे दिन आल्यावर कोण तुम कोण हम या भाजपाच्या नीतीवर त्यांनी टीका केली. आज हार्दिक पटेलची सभा न होण्यासाठी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला, असा आरोप त्यांनी केला. मुंबईतील जनता ही शिवसेनेच्या बाजूने असून, पालिेकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.