ईश्वरचिठ्ठी विरोधात शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर जाणार कोर्टात
By Admin | Published: February 25, 2017 10:40 AM2017-02-25T10:40:48+5:302017-02-25T10:46:37+5:30
भाजपा उमेदवाराला विजयी घोषित करण्याच्या निवडणूक अधिका-यांच्या निर्णयाविरोधात शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - ईश्वरचिठ्ठीने भाजपा उमेदवाराला विजयी घोषित करण्याच्या निवडणूक अधिका-यांच्या निर्णयाविरोधात शिवसेना उमेदवार सुरेंद्र बागलकर यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गिरगाव चंदनवाडी वॉर्ड क्रमांक 220 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपा उमेदवार अतुल शहा यांना समसमान मते मिळाली. मतांमध्ये टाय झाल्याने निवडणूक अधिका-यांनी ईश्वरचिठ्ठीने विजेता निवडण्याचा निर्णय घेतला.
त्यात अतुल शहा यांना विजयाची लॉटरी लागली. आता या निर्णयाविरोधात बागलकरांनी कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 तर, भाजपाला 82 जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी अपक्षांना महत्व आले असून, प्रत्येक जागा दोन्ही पक्षांसाठी महत्वाची आहे.
शिवसेनेला 3 अपक्षांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ 87 झाले आहे. अशा परिस्थितीत वॉर्ड क्रमांक 220 संबंधी न्यायालयाचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. अतुल शहा आणि सुरेंद्र बागलकरांना दोघांना प्रत्येकी 5946 मते मिळाली. काँग्रेसच्या नरेश शेठ यांना 5358 मते मिळाली.