'शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील अस्तित्व नाशिकवरच अवलंबून'; अजय बोरस्तेंनंतर हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:36 PM2024-04-12T15:36:57+5:302024-04-12T15:37:49+5:30
आता या दोघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटतात की श्रीकांत शिंदे यांनाच भेटून हात हलवत माघारी पाठविले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ माध्यमांना आपल्याला दिल्लीतून उमेदवारी मिळाल्याचे सांगत सुटले आहेत. यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे ठाण्याकडे निघाले होते, तर त्यानंतर मोर्चेबांधणी करण्यासाठी शिंदेंचे खासदार हेमंत गोडसे देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आता या दोघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटतात की श्रीकांत शिंदे यांनाच भेटून हात हलवत माघारी पाठविले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या जागेवरून शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोडसे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत.
अशातच बोरसे यांचे महत्वाचे वक्तव्य आलेले आहे. बाळासाहेबांचा आणि रामाचा धनुष्यबाण आहे, तो टिकलाच पाहिजे. नाशिक लोकसभा मतदार संघ शिवसेनेला मानणारा आहे. आज होणाऱ्या भेटीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा शिवसेनेसाठी कशी महत्त्वाची आहे यासंदर्भात सांगणार आहोत. पुढील निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री यांचा असेल. उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे अस्तित्व या जागेवर अवलंबून आहे, असे बोरसे म्हणाले आहेत.
ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट झालीच पाहिजे. मंदिरात आल्यानंतर देवाचे दर्शन झाले पाहिजे, असे ते म्हणाले. हेमंत गोडसे किंवा छगन भुजबळ यांच्याबरोबर संबंध चांगले आहेत. महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. त्यामुळे कोणी असेल तरी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.