मुंबईच्या प्रश्नावर शिवसेना लक्ष्य

By Admin | Published: December 24, 2014 12:40 AM2014-12-24T00:40:06+5:302014-12-24T00:40:06+5:30

विधान परिषदेत मुंबईविषयक प्रश्नांवरील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारावर बोट ठेवत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले.

Shiv Sena's target on Mumbai issue | मुंबईच्या प्रश्नावर शिवसेना लक्ष्य

मुंबईच्या प्रश्नावर शिवसेना लक्ष्य

googlenewsNext

अंतिम आठवडा प्रस्ताव : मुंबईसाठी समितीचा मुद्दा गाजला
नागपूर : विधान परिषदेत मुंबईविषयक प्रश्नांवरील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारावर बोट ठेवत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासासाठी समिती स्थापन करण्याचा मुद्दाही यावेळी गाजला. ही समिती नियुक्त करणे म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून मुंबईतील रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय, जेएनटीपी बंदरातून होणारी मालवाहतूक, सागरी सुरक्षा प्रशिक्षण केंद्र गुजरातमध्ये हलविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मुंबईविषयी प्रेम व्यक्त करणारी शिवसेना आता गप्प का, असा सवालही त्यांनी केला. डेंग्यू प्रतिबंधक लस खरेदीत झालेला गैरव्यवहार, मुंबई महापालिकेतील ई-निविदा घोटाळा, मुंबईच्या सुरक्षेचा मुद्दा, महापालिकेवर कं त्राटदारांचा ताबा यासह विविध मुद्यांवर त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.
काँग्रेसचे भाई जगताप यांनी मुंबईतील चाळीचा प्रश्न, पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न मांडला. विरोधी पक्षात असताना भाजप आणि शिवसेनेचे सदस्य वारंवार मुंबईच्या विकासासाठी केंद्रातून निधी आणण्याची मागणी करीत होते. आता ते किती निधी आणणार हे जाहीर करावे, अशी मागणी केली.
राष्ट्रवादीचे किरण पावस्कर यांनी मुंबईच्या दुरवस्थेला महापालिका आणि तेथील सत्ताधारीच दोषी असल्याचा आरोप केला. विविध सामाजिक उपक्रमासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद जाते कुठे, असा सवाल करीत त्यांनी खड्डे बुजविण्यावर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाकडे लक्ष वेधले. मुंबईतील ३०० आरक्षित भूखंडांवर लोकप्रतिनिधींचे क्लब असल्याचा आरोपही पावस्कर यांनी केला.
काँग्रेसचे जनार्दन चांदूरकर यांनी मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी समिती नेमण्याच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. हा घटनेवरच घाला असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी मुंबईतून मराठी माणसाला हुसकावून लावण्याचे काम मुंबई महापालिकेने व पर्यायाने तेथील सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप करीत अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेला धारेवर धरले. काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरपालिकांच्या अनुदानाचा मुद्दा मांडला, तर राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला. बुधवारी या चर्चेला सरकारकडून उत्तर देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena's target on Mumbai issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.