पेंग्विनच्या मृत्यूवरून शिवसेना अडचणीत
By admin | Published: November 4, 2016 05:42 AM2016-11-04T05:42:02+5:302016-11-04T05:42:02+5:30
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मुंबई : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापले असताना, आता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दुसरीकडे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार करत पेंग्विन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.
दक्षिण कोरियाहून मुंबईत आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एकाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. पेंग्विनला मुंबईत आणण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे हीच संधी साधून विरोधकांनी शिवसेनेची नाकाबंदी सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी अशा सर्वच विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे अखेर याची दखल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने घेतली आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांना पाठवलेल्या नोटीसद्वारे पेंग्विनच्या मृत्यूचा जाबच प्राधिकारणाने विचारला आहे. (प्रतिनिधी)
पेंग्विनच्या शवविच्छेदनाचा अहवाल आणि राणीबागेतील अन्य सात पेंग्विनची देखभाल कशी केली जात आहे, याबाबत एका आठवड्यात उत्तर देण्याची मुदत प्राधिकरणाने दिली आहे.
दुसरीकडे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार करीत पेंग्विनची हेळसांड झाल्यामुळे दीड वर्षांच्या डोरी या मादा पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार, लोकायुक्तांकडून पालिकेला नोटीस येण्याची दाट शक्यता आहे.
>प्राणिसंग्रहालयाची मान्यता धोक्यात?
२०१० पासून प्राणिसंग्रहालयामध्ये १४० प्राणी व पक्षांचा मृत्यू झाला आहे. पेंग्विनच्या मृत्यूने राणीच्या बागेतील सुविधांवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने याची दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. यात प्राण्यांची हेळसांड होत असल्याचे उघडकीस आल्यास, प्राणिसंग्रहालयाची मान्यता धोक्यात येणार आहे.
केंद्राच्या दोन नोटीस : सप्टेंबर महिन्यात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पालिकेला नोटीस पाठवून, सहा महिन्यांमध्ये प्राणिसंग्रहालयामध्ये प्राण्यांची चांगली सोय करण्यास बजावले होते. मात्र, गेल्या आठवड्यात पेंग्विनचा मृत्यू झाल्यामुळे प्राधिकरणाने दुसरी नोटीस पाठवून जाब विचारला आहे.
>केंद्रीय प्राधिकरणाच्या पत्रात काय?
दीड वर्षाच्या मृत पेंग्विनच्या आतड्यांना संसर्ग आणि यकृत निकामी होणे हे प्राणिसंग्रहालयातील व्यवस्था हलक्या दर्जाची असल्याचे संकेत देते. याबाबत प्राधिकरणाने दोन महिन्यांपूर्वी नोटीस पाठवून उचित काळजी घेण्यास बजावले होते. प्राधिकरणाचे पथक लवकरच मुंबईत येऊन प्राणिसंग्रहालयाची झाडाझडती घेणार आहेत.
पेंग्विन आणण्याचा निर्णय चुकला
दुर्मीळ प्रजातीपैकी असलेल्या पेंग्विनला व्यावसायिक कारणासाठी आयात करण्यावर बंदी आहे. त्यामुळे मूळ प्रदेशात त्यांना परत पाठविण्याची सूचनाही प्राधिकरणाकडून येण्याची शक्यता आहे. मात्र, सप्टेंबरच्या नोटिशीला महापालिकेने अद्याप उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता परत २८ आॅक्टोबरला प्राधिकरणाने दुसरी नोटीस पाठवली आहे.
>पेंग्विन उत्तम अवस्थेत
सातही हम्बोल्ट पेंग्विन उत्तम अवस्थेत असून, त्यांची प्रकृती चांगली आहे. हे सर्व पेंग्विन योग्य प्रकारे आहार घेत आहेत. यामध्ये एकूण ३ नर व ४ मादी यांचा समावेश आहे.
- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक (प्रभारी), वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय