सत्तास्थापनेत भाजपाला हवा शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा
By admin | Published: October 20, 2014 11:24 AM2014-10-20T11:24:00+5:302014-10-20T15:00:38+5:30
सत्तास्थापनेसाठी भाजपाने शिवसेनेसोबत जायची तयारी दर्शवली असली तरी शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अट भाजपने शिवसेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - सत्तास्थापनेसाठी भाजपाने शिवसेनेसोबत जायची तयारी दर्शवली असली तरी शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी अट भाजपाने शिवसेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपाची ही अट मान्य करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाने १२३ जागांवर विजय मिळवला असला तरी सत्तास्थापनेसाठी भाजपाला आणखी २२ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बाहेरुन पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेसाठी भाजपाने संपर्क साधलेला नाही असे सांगत भाजपने पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपामधील अनेक नेत्यांना राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेसोबत युती करण्यास पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी चर्चेला सुरुवात केल्याचे समजते. शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा द्यावा हीच भाजपाची प्रमुख अट असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रविवारी रात्री उशीरा उद्धव ठाकरे आणि भाजपाप्रदेशाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दुरध्वनीद्वारे चर्चा झाली. यामध्ये दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जुन्या गोष्टी विसरुन पुढे जाण्यावर भर दिला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी शिवसेना - भाजपाने एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली. मात्र उद्धव ठाकरेच याविषयी अंतिम निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.