Shiv Sena Vardhapan Din: शिवसेनेचा वर्धापन दिन यावर्षीही ऑनलाईन, उद्धव ठाकरे करणार ऑनलाईन मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 02:04 PM2022-06-16T14:04:17+5:302022-06-16T14:05:10+5:30
Shiv Sena Vardhapan Din 2022: कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन हा मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला होता. दरम्यान, यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे.
मुंबई - कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन हा मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला होता. दरम्यान, यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने शिवसेनेने वर्षापन दिनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन हा ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार असून, त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापनदिनाबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले होते की, सध्या मुंबईमध्ये तीन साडेतीन हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. वर्धापन दिनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला तर गर्दी वाढेल. त्यामुळे त्यावर आता बोलता येणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर वाढत असलेल्या अडचणी, केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या नेत्यांना करण्यात येत असलेलं लक्ष्य, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा झालेला पराभव, तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख वर्धापनदिनी शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.