तैलाभिषेकाने शिवयोगी सिध्दरामेश्वर यात्रेस प्रारंभ
By appasaheb.patil | Published: January 13, 2020 12:43 PM2020-01-13T12:43:45+5:302020-01-13T12:46:20+5:30
हर्र बोला हर्र चा जयघोष; ६८ लिंगांना नंदीध्वजांच्या मिरवणुकीद्वारे तैलाभिषेक
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेला सोमवारी सकाळी नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. साडेआठशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी शहराच्या पंचक्रोशीत सिध्देश्वर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या ६८ लिंगांना नंदीध्वजांच्या मिरवणुकीद्वारे तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करण्यास सुरूवात झाली आहे़ या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रातून लाखो भाविक सोलापुरात दाखल झाले आहेत.
उत्तर कसब्यातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्याातून सकाळी नऊच्या वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नंदीध्वजांची पूजा करण्यात आली़ यावेळी त्यांच्यासोबत उज्ज्वला शिंदे, आ़ प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी पालकमंत्री विजयकुमारदेशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, रविवारी मध्यरात्रीनंतर मानाच्या पहिल्या दोन नंदीध्वजांना साज चढविण्यात आला होता. उर्वरित विविध समाजाचे मान असलेले पाच नंदीध्वज सकाळी हिरेहब्बू वाडयाात आणले गेले. विविध पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक हळू हळू दुपारी सिध्देश्वर मंदिरात पोहोचली.
या मिरवणुकीत पूर्वापार परंपरेनुसार हिरेहब्बूंनी श्री सिध्देश्वरांचा योगदंड धरला होता. सिध्देश्वर मंदिरात ‘श्री’ च्या मूर्तीला तैलाभिषेक झाल्यानंतर शहराच्या पंचक्रोशीतील ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी ही मिरवणूक मार्गस्थ झाली. सात नंदीध्वजांमध्ये पहिला नंदीध्वज सिध्देश्वर देवस्थानाचा, दुसरा देशमुख घराण्याचा, तिसरा लिंगायत माळी समाजाचा, चौथा व पाचवा विश्व ब्राह्मण समाजाचा तर सहावा व सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा असतो. हलग्यांचा कडकडाट, संगीत बॅन्ड पथकांचा सुमधुर निनाद, सनई-चौघडयाांंचा मंगलमय स्वर, भाविकांमधून उत्स्फूर्तपणे होणारा श्री सिध्देश्वराचा जयजयकार अशा उत्साही वातावरणात निघालेल्या नंदीध्वजांचे मानकरी व शेकडो भाविकांनी पूवार्पार परंपरेनुसार परिधान केलेले पांढºया शुभ्र बारा बंदीचा पोशाख मिरवणुकीच्या मांगल्याची साक्ष देत होते.