शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे निधन
By admin | Published: May 11, 2015 02:56 AM2015-05-11T02:56:41+5:302015-05-11T02:56:41+5:30
ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे व्याख्याते आणि मराठेशाहीचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे रविवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले.
पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे व्याख्याते आणि मराठेशाहीचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे रविवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी वासंती, मुलगा निशांत, विवाहित कन्या नियती असा परिवार आहे.
सांगली येथील दौऱ्याहून आल्यानंतर ते आजारी झाले. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अमेरिकेहून त्यांच्या कन्येचे आगमन झाल्यानंतर सोमवारी सकाळी ११च्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बेडेकर यांचा जन्म १७ आॅगस्ट १९४९ रोजी पुण्यात झाला. त्यांच्या मातोश्री प्रमिला या सरदार रास्ते यांच्या घराण्यातील. वडील गंगाधरपंत हे उत्तम खेळाडू होते आणि दिलरुबासह काही वाद्यांमध्ये त्यांचा हातखंडा होता. बालवयात बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘दख्खनची दौलत’ हे पुस्तक त्यांच्या हाती पडले, तेव्हापासून ते गडकिल्ले, शिवइतिहास यांच्या प्रेमात पडले.
मॅकॅनिकल इंजिनीअर झाल्यानंतर ते किर्लोस्कर कमिन्समध्ये दाखल झाले. १५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी केवळ गडकोटांच्या आकर्षणापोटी मोठे पद आणि पगाराची नोकरी सोडून दिली. महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ल्यांची भटकंती करून
५ हजार व्याख्याने दिली, शोधनिबंध सादर केले. देशविदेशातील गडांचे निरीक्षण करून गजकथा, दुर्गकथा लिहिल्या. त्यांची २० पुस्तके प्रसिद्ध आहेत.
-------------
१९६८पासून भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन गजाननराव मेहंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोडी, पर्शियन, फार्सी, उर्दू भाषेतील कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. याद्वारे त्यांनी शिवाजी महाराज यांची ३ तर संभाजी महाराजांची २ अप्रकाशित पत्रे उजेडात आणली. त्यांनी सुंदर निसर्गचित्रे, रेखाचित्रे रेखाटली आहेत.