शिवाजी कोळीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Published: December 8, 2015 02:32 AM2015-12-08T02:32:52+5:302015-12-08T02:32:52+5:30
किडनी तस्करी प्रकरणी सलग तिसर्या दिवशीही नागपूरच्या डॉक्टरांची चौकशी.
अकोला: किडनी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सांगली जिल्ह्यातील शिवाजी कोळी याला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी देवेंद्र सिरसाट व आनंद जाधव यांना अटक केल्यानंतर, त्यांच्या चौकशीदरम्यान शिवाजी कोळी, विनोद पवार यांच्यासह नागपूर, औरंगाबाद येथील काही डॉक्टरांची नावे समोर आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रविवारी दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील मांडवा येथील विनोद पवार याला आणि त्याच रात्री सांगलीच्या शिवाजी कोळी याला अटक केली. विनोद पवारला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोमवारी दुपारी शिवाजी कोळी याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. शिवाजी कोळी हा किडनी तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या रॅकेटमध्ये काही डॉक्टरांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो कुणाच्या माध्यमातून हे रॅकेट चालवतो आणि त्याने आतापर्यंत किती लोकांच्या किडन्या काढल्या आहेत, याची माहिती त्याच्याकडून घ्यायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
*नागपूरच्या डॉक्टरांची चौकशी सुरूच
किडनी तस्करी प्रकरणामध्ये नागपूर व औरंगाबाद येथील प्रत्येकी दोन डॉक्टर आणि एका हॉस्पिटलच्या सीईओचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पाचारण केले. दोन दिवसांपासून या डॉक्टरांची स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून, त्यांचे जबाबही नोंदविण्यात येत आहेत. औरंगाबादेतील दोन डॉक्टर व एका सीईओची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले; परंतु नागपुरच्या दोन डॉक्टरांची सलग तिसर्या दिवशीही पोलिसांनी चौकशी करून, त्यांचे जबाब नोंदविले.
*पोलिसांच्या मदतीसाठी वैद्यकीय समिती
अवयव दान कायद्याबाबतची विस्तृत माहिती, किडनी काढणे व प्रत्यारोपणासंदर्भात कागदपत्रांची तरतूद कशी करायची, त्यासाठी कोणती पद्धत आहे, कायदा काय म्हणतो, याबाबत पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मदत मागितली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना पत्र पाठवून याप्रकरणी त्यांचे सहकार्य मागितले आहे. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयातर्फे तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय समिती याकामी लवकरच नियुक्त करण्यात येईल.