‘कर्नाटकात शिवाजी महाराजांना देव मानतात’
By Admin | Published: April 24, 2017 03:36 AM2017-04-24T03:36:15+5:302017-04-24T03:36:15+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे़ कर्नाटकातही शिवाजी महाराज यांना देव मानतात, असे गौरवोद्गार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी काढले़
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे़ कर्नाटकातही शिवाजी महाराज यांना देव मानतात, असे गौरवोद्गार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी काढले़
मुंबई उच्च न्यायालयात शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती नुकतीच साजरी करण्यात आली़ या वेळी मुख्य न्यायमूर्ती चेल्लूर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले़ शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले़, उभारलेली सुरक्षा यंत्रणा, याला जगात तोड नाही़ शिवाजी महाराज यांच्या कीर्तीची माहिती येणाऱ्या पिढीला कळावी यासाठी किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले़
महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीमुळेच आज महिलांना शिक्षण उपलब्ध झाले़ त्यांनी समाज प्रबोधनासाठी केलेले कार्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा देणारे आहे़ तसेच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हे विधी क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहेत़ बाबासाहेबांनी राज्यघटनेची केलेली मांडणी, या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, यामुळे लोकशाही बळकट आहे, असेही मुख्य न्यायमूर्ती यांनी नमूद केले़
उच्च न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ कर्मचारी संघटनेचे सचिव विद्याधर काटे व इतर पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)