शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे कुळवाडीभूषणच- संभाजीराजे भोसले
By Admin | Published: June 27, 2017 08:56 PM2017-06-27T20:56:34+5:302017-06-27T21:35:29+5:30
शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच असल्याचे मत राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 - छत्रपती शिवाजी महराज हे कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते. त्यांनी आठरा पगडजाती आणि बाराबलुतेदरांना सोबत घेऊन रयतेच राज्य स्थापन केले. यामुळे शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच असल्याचे मत राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यास केंद्रातर्फे खासदार संभाजीराजे भोसले आणि ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य टी.एस. पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. तर व्यासपीठावर कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. राजेश रगडे, डॉ. नंदकुमार राठी, डॉ. राम चव्हाण आणि डॉ. राजेश रगडे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या कार्यकाळात २०० वर्षांपेक्षा अधिक फरक आहे.
शिवाजी महाराज यांनी बाराबलुतेदारांना सहभागी करून स्वराज्याची स्थापना केली. तर छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. दोघांमध्ये रतय आणि बहुजनांची प्रगती हेच महत्वाचे असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. दोन्ही राजांकडे दलित व सवर्ण हा शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही. दोघांनाही बहुजन हाच शब्द वापरला. यामुळे बहुजनांच्या उध्दारासाठी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखले होते. यासाठी राज्याच्या एकुण महसुलाच्या २३ टक्के वाटा हा शिक्षणावर खर्च करण्याचे धोरण अवलंबिले. सुरुवातील सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी एकच बोर्डिंग काढले. पण हा प्रयोग फसल्यामुळे शाहू महाराजांनी विविध समाजाचे तब्बल २३ बोर्डिंगकाढून बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच प्रस्ताविक शाहू महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राजेश करपे यांनी केले. यात अध्यासन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हंसराज जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.
नुसतेच पुरोगामी असून चालणार नाही
सर्वजण पुरोगामी असल्याचे सांगतात. मात्र त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार किती आत्मसात केले. हा महत्वाचा मुद्दा आहे. शाहू घराण्याचा वारसदार म्हणून मी केवळ मराठ्यांचे नेतृत्व करत नाही. तर सर्व बहुजनांचे नेतृत्व करत असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केले.