शिवाजी पार्कमध्ये सर्वांत उंच राष्ट्रध्वज?
By admin | Published: February 23, 2016 01:17 AM2016-02-23T01:17:03+5:302016-02-23T01:17:03+5:30
देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज मुंबईत उभारण्याची मागणी शिवसेनेकडून पुढे आली आहे़ मात्र, यासाठी निवड करण्यात आलेल्या शिवाजी पार्क परिसराला हेरिटेज दर्जा असल्याने याबाबतचा प्रस्ताव
मुंबई : देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज मुंबईत उभारण्याची मागणी शिवसेनेकडून पुढे आली आहे़ मात्र, यासाठी निवड करण्यात आलेल्या शिवाजी पार्क परिसराला हेरिटेज दर्जा असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुंबई पुरातन वास्तू समितीपुढे पाठविण्यात आला आहे़
नवी मुंबईमध्ये २२५ फुटांवर राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे़ मात्र, देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा मान मुंबईला मिळावा, अशी मागणी शिवसेनेकडून पुढे आली होती़ याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत गेल्या वर्षी मंजूर झाल्यानंतर, पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे ३ महिन्यांपूर्वी अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता़ मात्र, राष्ट्रध्वज शिवाजी पार्कवरच उभारण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाशेजारी अथवा शिवाजी पार्कमध्ये मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्याची मागणी आहे़, परंतु या परिसराला हेरिटेजचा दर्जा असल्याने, यासाठी मुंबई पुरातन वास्तू समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे़ त्यामुळे हा प्रस्ताव पुरातन वास्तू समितीच्या पटलावर आहे़ समितीच्या मंजुरीनंतर यावर अंमल होईल, असे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
शिवाजी पार्कच कशासाठी?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, जागतिक दर्जाचे शहर आहे़ त्यामुळे या ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा मान या शहराला मिळावा़ शिवाजी पार्कवर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होत असतात़ महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन असे महत्त्वाचे कार्यक्रमही होत असल्याने, या ठिकाणी हा राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, अशी शिवसेनेची मागणी आहे़