शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:36 AM2024-05-11T09:36:05+5:302024-05-11T10:34:10+5:30
लोकसभा निवडणुकीची निवडणूक लढवण्याबाबत मनसेमध्ये खल सुरू होता. मात्र बराच काळ निर्णय होत नव्हता. तीन पक्षांच्या युतीत आपल्याला अपेक्षित स्थान मिळणार नाही, याची जाणीव होताच मनसेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरणार होता. त्यादृष्टीने सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी पालिकेकडे अर्जही केला होता, तो अर्ज मान्यही झाला आहे. मात्र मनसे निवडणूकच लढवत नसल्याने शिवाजी पार्कचे मैदान आरक्षित मनसेसाठी; परंतु १७ मे रोजी सभा मात्र होणार महायुतीची, अशी गंमत आहे!
या सभेच्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे असतील. महायुतीचे मुंवईतील उमेदवारही मंचावर असतील. परंतु ज्या पक्षाच्या, अर्थात मनसेच्या नावावर मैदान आरक्षित झाले, त्या पक्षाचा एकही उमेदवार मंचावर नसेल. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे मैदानही त्यांनी बिनशर्त दिले आहे.
लोकसभा निवडणुकीची निवडणूक लढवण्याबाबत मनसेमध्ये खल सुरू होता. मात्र बराच काळ निर्णय होत नव्हता. तीन पक्षांच्या युतीत आपल्याला अपेक्षित स्थान मिळणार नाही, याची जाणीव होताच मनसेने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मनसेने ज्या तारखेसाठी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता, तो अर्ज मान्य केला आहे.
शिवाजी पार्क मिळावे म्हणून मनसेने आणि उद्धवसेनेने अर्ज केला होता. मात्र, नगरविकास विभागाने मनसेला सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या मैदानासाठी आधी कुणी परवानगी मागितली होती, याची विचारणा उद्धवसेना नगरविकास विभागाकडे करणार आहे. जर उद्धवसेनेचे पत्र आधी गेले असेल तर नगरविकास विभागाच्या या निर्णयाला पक्ष न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.