शिवगर्जना करत तरुणांची किल्ले स्वच्छता मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:47 AM2019-11-18T01:47:58+5:302019-11-18T01:48:13+5:30
१५० मावळे, रणरागिणींचे श्रमदान; सोलापूरमध्ये चार जिल्ह्यांतील स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनातील मावळ््यांप्रमाणे येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी भगव्या वस्त्रातील तरूण-तरुणींनी स्वच्छता केली.
हे तरुण-तरुणी मावळे व रणरागिणींचे प्रतिरूपच होते. गडकोट, किल्ले स्वच्छ राखणे हे आपले कर्तव्य समजून फक्त सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद येथील राजा शिवछत्रपती परिवाराचे मावळे व रणरागिणी यांनी शिवकार्य केले.
सकाळी आठ वाजता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. किल्ल्याचे प्रवेशद्वार रांगोळीने सजविण्यात आले होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिवगर्जना करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
२० जणांचा संघ तयार करण्यात आला. प्रत्येक संघासोबत झाडे-झुडपे तोडण्यासाठी हत्यारे देण्यात आली होती. पाहता पाहता परिवाराच्या सदस्यांनी किल्ला व किल्ल्याचा परिसर स्वच्छ केला.
वॉकीटॉकीवर संवाद
मोबाईलऐवजी प्रत्येक संघाकडे एक वॉकीटॉकी देण्यात आला होता. त्याद्वारे संवाद साधण्यात आला.
सोलापुरातील काही संस्था व संघटनाकडून तरुणांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती.
राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने सोलापुरातील भुईकोट किल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ सेफ्टी बेल्टच्या सहायाने बुरुजावर वाढलेली झाडे तोडण्यात आली.