ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शिवाजीराव माने यांनी केला शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:44 PM2023-12-12T12:44:12+5:302023-12-12T12:45:39+5:30
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आणि त्यांना अभिप्रेत असलेले काम करणारे सरकार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख तसेच माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस शिवाजीराव माने यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपुर येथील 'रामगिरी' या निवासस्थानी उपस्थित राहून शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. शिवाजीराव माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, महाराष्ट्र कामगार सेनेचे राज्य चिटणीस व्यंकटराव खंडेराव बिराजदार, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, लातूर ग्रामीणचे तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, शिवाजी पांढरे, युवराज वंजारे, महिला आघाडी संघटीका सविताताई पांढरे, सौ.अरुणाताई माने यांच्यासह औसा, निलंगा, देवणी, शिरूर, आनंदपाळ आणि एसटी कामगार सेनेचे असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी राज्यातील सरकार हे सर्व घटकांना न्याय देणारे सरकार असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आणि त्यांना अभिप्रेत असलेले काम करणारे सरकार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच ज्या भागात आपण काम करता तिथे पक्ष बळकट करण्यासाठी काम करावे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवलात तो नक्कीच सार्थ ठरेल आणि तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे एकनाथ शिंदे म्हणाले.