विलासराव देशमुखांचा पराभव केलेल्या नेत्यानं घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:17 PM2024-08-06T22:17:39+5:302024-08-06T22:18:49+5:30

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा पहिला टप्पा सुरू असून ते आज मराठवाड्यातील लातूर इथं पोहचले. 

Shivajirao Patil Kavhekar The leader who defeated Vilasrao Deshmukh met MNS chief Raj Thackeray | विलासराव देशमुखांचा पराभव केलेल्या नेत्यानं घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट

विलासराव देशमुखांचा पराभव केलेल्या नेत्यानं घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट

लातूर - मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांचा लातूर इथं मुक्काम आहे. राज ठाकरे लातूरात पोहचताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्याचसोबत राज यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

राज ठाकरे आज लातूरमध्ये असून याठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते अनेक सामाजिक संघटनातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. लातूरमधील शेतकऱ्यांनीही राज ठाकरेंची भेट घेत त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली. यावेळी माजी आमदार आणि सध्याचे भाजपा किसान मोर्चाचे गोवा, गुजरातचे प्रभारी असलेले शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं विविध तर्कवितर्क लढवले जात आहे. शिवाजीराव पाटील कव्हेकर हे लातूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. 

विशेष म्हणजे शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी १९९५ साली काँग्रेस नेते विलासराव देशमुखांचा पराभव केला होता. तेव्हा ते जनता दलाचे उमेदवार होते. कव्हेकर आणि देशमुख हे कट्टर विरोधक होते. मात्र २००९ मध्ये लातूर मतदारसंघाची फेररचना होत २ मतदारसंघ पडले. त्यात लातूर शहरातून अमित देशमुखांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. यावेळी विलासरावांनी कव्हेकर यांची घरी जाऊन नाराजी दूर केली. तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र २०१९ मध्ये लातूर ग्रामीणमधून ते निवडणूक लढवू इच्छित होते. मात्र काँग्रेसनं याठिकाणी अमित देशमुखांचे लहान बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसकडून मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी भाजपात प्रवेश केला. 

दरम्यान, मराठवाडा वॉटरग्रिड योजना सुरुवात करणे, उजनी धरणातून वाहून जाणारे पाणी ज्याला शासनाची कॅबिनेट मान्यता असून ते सिना कोळेगाव येथून मांजरा धरणात आणावे आदी मराठवाड्याच्या विविध विकासाच्या चर्चा राज ठाकरेंसोबत केल्याचं शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सांगितले. मात्र कव्हेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Web Title: Shivajirao Patil Kavhekar The leader who defeated Vilasrao Deshmukh met MNS chief Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.