शिवरायांच्या आरमाराला मिळणार झळाळी

By admin | Published: September 1, 2015 09:22 PM2015-09-01T21:22:30+5:302015-09-01T21:22:30+5:30

आमदार आदर्श दत्तक ग्राम : आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे इतिहासाला मिळणार उभारी

Shiva's helm will get very bright | शिवरायांच्या आरमाराला मिळणार झळाळी

शिवरायांच्या आरमाराला मिळणार झळाळी

Next

शिवाजी गोरे - दापोली  छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व आपल्या शौर्याने आरमाराचा कारभार सांभाळून शत्रूला जेरीस आणणारे शूरवीर आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचा उज्ज्वल इतिहास असलेले व ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारे गाव हर्णै! या गावाला आमदार संजय कदम यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतले आहे, त्यामुळे आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत शिवरायांच्या ऐतिहासिक आरमाराला नवी झळाळी मिळणार आहे.दापोली तालुक्यातील हर्णै गावाला प्राचीन काळापासून फार महत्त्व आहे. गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. या गावातील किल्ले इतिहासाची साक्ष देत आहेत. हर्णैतील सुवर्णदुर्ग किल्ला मुघल साम्राज्य, शिवशाहीच्या इतिहासाची साक्ष देत आहे. कधी काळी सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या मोहात ब्रिटिशसुद्धा पडले होते. सुवर्णदुर्ग किल्ल्यावरून ब्रिटिशांनी जिल्ह्याचा कारभारसुद्धा केल्याचा इतिहास आहे. हर्णैतील सुवर्णदुर्ग किल्ला जिल्ह्याचे ठिकाण होते. सुवर्णदुर्ग किल्ला किनाऱ्यापासून एक मैल आत असलेल्या बेटावर उभारण्यात आला आहे. समुद्राने वेढलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी होडीनेच जावे लागते. हा किल्ला कोणी बांधला, याचा स्पष्ट उल्लेख नाही. इ. स. १६६०च्या सुमारास शिवाजी महाराजांनी शत्रूच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून ताब्यात घेतल्याचा इतिहास आहे. तेव्हापासून सुवर्णदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात होता. तो इ. स. १८१८ पर्यंत राहिला. अचलोजी मोहिते किल्लेदार असताना सिद्धीने वेढा दिला होता. या बिकट प्रसंगाला तोंड देत कान्होजी आंग्रे यांनी शत्रूला शर्थीची झुंज देऊन हर्णै सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी कोरला आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल ही पदवी देऊन आरमाराधिपती केल्याचा इतिहास या सुवर्णदुर्ग किल्ल्याला लाभला आहे.
हर्णै येथील फत्तेगड, कनकदुर्ग, सुवर्णदुर्ग, भुईकोट अशा एकूण पाच किल्ल्याचा इतिहास हर्णै गावाला लाभला आहे. सुवर्णदुर्गचे दर्शन होण्यापूर्वी प्रथम दर्शनी भुईकोट जलदुर्ग गोवा किल्ला लागतो. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी व शत्रूवर जमिनीवरून हल्ला करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावरील परकीय आक्रमण हाणून पाडण्याचे काम या किल्ल्यातून होत होते. या किल्ल्यांपैकी गोवा किल्लासुद्धा फार महत्त्वाचा किल्ला होता. सुवर्णदुर्ग जिंकल्यावर पेशवे व इंग्रज यांच्यात १७५५ साली तह झाला. त्यानंतर कर्नल केनेडी यांनी इ. स. १८१८ला हल्ला करुन ६९ तोफा व १९ शिपाई गडाची पाहणी करीत असल्याचा इतिहास आहे. हर्णै येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मातोश्री यांची समाधी आहे. तसेच ब्रिटिशकालीन चर्चसुद्धा आहे.
या वास्तुमुळे या गावाकडे पर्यटकांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर ओढा आहे. परंतु त्याकडे डोळेझाक झाल्याने ती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. गावातील ऐतिहासिक वास्तूला गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी किल्ल्यांचे सुशोभिकरण, सुवर्णदुर्ग किल्ला ते भुईकोट किल्ला दरम्यान जेटी बांधून पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात असतात. परंतु आत कसल्याच सुविधा नसल्याने गैरसोय होते.
या गावाला उज्ज्वल इतिहास लाभला असला तरीही अलिकडच्या काळात या गावातील ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, बंदर जेटीसारख्या समस्या भेडसावत आहेत. हर्णै गाव वाड्या व मोहल्ल्यात विखुरलेले आहे. या गावात १२ वाड्या व ८ मोहल्ले यांचा समावेश आहे. वाडी - मोहल्ल्याकडे जाणारे रस्ते सुस्थितीत नाहीत. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र यामुळे अगदी अडगळीत सापडलेल्या या गावाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. हर्णै गावात पारंपरिक मच्छीमारी बंदर आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्नाचे बंदर येथे आहे. या बंदरातील मच्छीमारी व्यवसायावर पाच हजार कुटुंबांचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष उदरनिर्वाह चालतो. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बंदरात होते. मात्र, हर्णै बंदरात जेटीचा अभाव असल्याने आजही मच्छीमार बांधवांना पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागते. मच्छीमारी बंदरातील लिलाव प्रक्रिया पुळणीवर घ्यावी लागते. मासे विक्री करण्यासाठी बसणाऱ्या महिलांसाठी मच्छीमार्केट किंवा बसण्यासाठी ओटे नसल्याने पुळणीवर दुर्गंधीयुक्त ठिकाणी बसून मासे विकावे लागत आहेत.
मच्छी खरेदी सेंटरमधून सोडण्यात येणारे पाणी गटार सुविधा नसल्याने उघड्यावर साठून आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बंदरावर जेटी नसल्यामुळे मच्छीमार बांधवांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हर्णै बंदरात जेटी व्हावी, यासाठी मच्छीमार बांधव गेली अनेक वर्षे शासनाकडे मागणी करीत आहेत. हर्णै बंदरातील मच्छी लिलाव पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. परंतु येथील दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करतात.
हर्णै गावाला आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतल्याची घोषणा आमदार संजय कदम यांनी केल्यानंतर या गावात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली. या गावात शासनाच्या सर्व योजना राबवण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय झाला. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून प्रत्येकाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गावात आरोग्य केंद्रांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय आहे. हर्णै गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यासाठी लोकांना आंबवली किंवा दापोली उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते. हर्णै गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजना असूनसुद्धा दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. बंदरातील हंगामात पाणी विकत घेण्याची वेळ मच्छी व्यावसायिकांवर आली आहे. दाट लोकवस्तीमुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. यावर पर्याय म्हणून समुद्रकिनाऱ्यावरुन पर्यायी मार्ग काढण्याची गरज आहे.

हर्णै बंदरामुळे मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मच्छी व्यवसायावर अवलंबून असणारे छोटे - मोठे पुरक व्यवसायसुद्धा बंदरामुळे टिकून आहेत. परंतु शासन हर्णै बंदरातीरल जेटीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मच्छीमार्केट, कोल्ड स्टोअरेज, लाईट, पाणी, रस्ते, बोटीसाठी जागा, डिझेलची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बंदिस्त गटार, सिमेंटचे रस्ते, बसण्यासाठी व्यवस्था, बंदरातील लिलाव चांगल्या ठिकाणी घेण्याची व्यवस्था केवळ एका जेटीमुळे होऊ शकेल. त्याकरिता जेटीची गरज आहे. सध्या येणारे पर्यटक, खलाशी, स्थानिक मच्छीमार, मच्छीविक्रेते यांना सुलभ शौचालयाची गैरसोय सहन करावी लागत आहे.
- अस्लम अकबाणी, माजी सरपंच


ऐतिहासिक वारसा, पारंपरिक मच्छीमारी बंदर, सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा, सुवर्ण दुर्ग किल्ल्यांची सफर यामुळे हर्णै गाव पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे बनले आहे. हर्णै पर्यटनाच्या नकाशावर जागतिक स्तरावर झळकले आहे. अनेक देश-विदेशातील पर्यटक हर्णैला भेट देत असतात. परंतु हर्णैचा आजपर्यंत पाहिजे तसा विकास झाला नाही. ७ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, भौगोलिक विकास होणे गजरेचे होते. छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमिचा विकास करणे हेच आपले ध्येय आहे. या गावातील ऐतिहासिक किल्ल्यांंचा पर्यटन विकास, बंदर जेटी, गावाला २४ तास मुबलक स्वच्छ पाणी, वीज, उच्च शिक्षणाची सोय, वायफाय सुविधा, आरोग्य केंद्र मिळवून देऊ. हर्णै गावाचा कायापालट करुन शिवरायांच्या आरमाराला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न होणार आहे. गावातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शौचालय, पर्यटन, उच्च शिक्षण, रोजगार निर्मिती केली जाणार आहे. हर्णै गावाचा कायापालट करुन ऐतिहासिक गावाला गतवैभव प्राप्त करुन देण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यात येईल. हर्णै गावाचा इतिहास पुन्हा जगासमोर आणण्यासाठी ठोस काम करु.
- आमदार संजय कदम

हर्णै गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात या गावाच्या पायाभूत सुविधेत वाढ होणे गरजेचे आहे. हर्णै नळपाणी पुरवठा करणाऱ्या बांधतिवरे नळपाणी योजना, खेमधरण योजना अशा दोन योजना आहेत. परंतु बांधतिवरे नळपाणी योजना लांबची असल्याने पाणीपुरवठा वीजबिल जादा येत असते. खेड धरणावरील योजना जुनी आहे. धरणातील गाळ काढून खेमधरणातून पाणीपुरवठा केल्यास हर्णै गावाला मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. परंतु धरणाला गळती लागली असून, आत गाळ साठल्यामुळे खेम धरण नळपाणी पुरवठा योजना निरुपयोगी बनू लागली आहे.
- मुनीरा शिरगावकर,
सरपंच, कोट


थोडक्यात असे आहे
हर्णै गाव
लोकसंख्या : सात हजार
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र : १
सर्वात मोठे बंदर : १
गावातील ऐतिहासिक किल्ले : ४
मंदिरे ५, मस्जीद ५, मोहल्ले ८, चर्च ३.
वाड्या १२
मुख्य रस्ता : कोस्टल हायवे
नळपाणी योजना : २
हायस्कूल : २, मराठी शाळा ४
दूरक्षेत्र १, कस्टम आॅफीस १
पोस्ट आॅफीस १

Web Title: Shiva's helm will get very bright

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.