आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 03:32 PM2019-01-05T15:32:47+5:302019-01-05T15:56:46+5:30
शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंसोबतचा वाद मिटण्याचे संकेत
सातारा: शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत खुद्द छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं. आमची दोन घराणी नाहीत, छत्रपतींचं घराणं एकच आहे, असं म्हणत त्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले आहेत.
माझी निष्ठा शरद पवारांवर आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायल्या मिळाल्या आहेत. त्यांचा सहवास आधी मिळाला असता, तर बरंच काही शिकता आलं असतं असं वाटतं. मला आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलो आहे, असं आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात म्हटलं. छत्रपतींचं घराणं एकच आहे. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी उदयनराजेंसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले.
थोरांचे आशीर्वाद ! 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतला 'मुका'
शिवेंद्रराजे आणि उदयनेराजे या दोन छत्रपतींमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघेजण एका कार्यक्रमात आमने-सामने आले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांची चौकशी केली होती. त्यावेळी झालेला संवाददेखील शिवेंद्रराजेंनी सांगितला. त्यावेळी उदयनराजेंनी माझा खांदा वारंवार दाबला. त्यावेळी सारखा खांदा का दाबता, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर तब्येत बघतोय, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर माझा व्यायाम व्यवस्थित सुरू आहे, असं मी त्यांना सांगितलं, अशा शब्दांमध्ये त्यावेळी झालेला संवाद शिवेंद्रराजेंनी सांगितला.
उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबला...दोन्ही राजे आमनेसामने...पाहा काय घडले पुढे
छत्रपतींच्या घराण्यातील असल्यानं आम्हाला मोठं वलय मिळालं आहे. आम्ही आमदार-खासदार आहोत म्हणून आम्हाला मान-सन्मान मिळतो अशातला भाग नाही. तर छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्ती असल्यानं आम्हाला प्रतिष्ठा मिळते. आमची दोन घराणी नाहीत. आमचं घराणं एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपतींचं घराणं. या घराण्याच्या प्रतिष्ठेला माझ्या वर्तणुकीमुळे कधीही धक्का लागू देणार नाही. छत्रपतींच्या घराण्यातले असल्यानं लोकांना आमच्यावर विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं शिवेंद्रराजे म्हणाले.
लोकांपेक्षा कोणी मोठा नाही