शिवजयंतीः साक्षात छत्रपती शिवाजी महाराज उधारी ठेवतात तेव्हा... गोष्ट वाचून मानाचा मुजरा कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:29 PM2020-02-19T12:29:44+5:302020-02-19T12:33:48+5:30

Chhartapati Shivaji Maharaj: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. आणि हे तर स्वराज्याच्या प्रेमापोटी उभारलेलं युद्ध होतं.

Shivjayanti: when Chhatrapati Shivaji Maharaj keeps borrowing of british | शिवजयंतीः साक्षात छत्रपती शिवाजी महाराज उधारी ठेवतात तेव्हा... गोष्ट वाचून मानाचा मुजरा कराल!

शिवजयंतीः साक्षात छत्रपती शिवाजी महाराज उधारी ठेवतात तेव्हा... गोष्ट वाचून मानाचा मुजरा कराल!

googlenewsNext
ठळक मुद्देशिवरायांनी इंग्रजांकडून माल उधार घेतला होता आणि त्याचे पैसे चुकवताना इंग्रजांना अक्षरशः जेरीस आणलं होतं.  तांब्याची खरेदी ही मुंबईच्या इंग्रजांकडून केली आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे रायगडावर कॅश नाही.महाराजांची अपॉईंटमेंट मागितली तर महाराज कामात आहेत म्हणून १ महिना परत दोघांना गडाखाली थांबवलं.

>> राहुल रामदास महांगरे

उधारीचा अनुभव आला नाही असा एकही माणूस अख्ख्या जगात सापडणार नाही. कोणाचे तरी कधीतरी कटिंग चहा आणि वडापावचे दिलेले पैसे तर उद्या देतो म्हणून बुडीत खात्यात कधीच गेलेले असतात. पण मोठ्या रकमेच्या उधारीसाठीसुद्धा कोणीतरी कधीतरी तुम्हाला नक्कीच तंगवलेलं असणार. आज देतो भावा, उद्या देतो भावा, आज लेट आलो घरी म्हणून डोक्यातूनच निघून गेलं. या वेळी क्लायंट कडून येणारं पेमेंट अडकलंय ते क्लिअर झालं की तुला मोकळा करतो लगेचच. मग अशी कारणांची लांबलचक लिस्टच तयार होते आणि मग माणसाचा अक्षरशः अंत पाहिला जातो. शेवटी उधारी द्यायला समोरचा तयार होतो आणि आपला जीव भांड्यात पडतो. 

पण ऐनवेळी तो म्हणतो की, भावा १० हजार द्यायचं ठरलं होतं पण माझ्याकडे आठ हजारच आहेत, मी आठ दिवसात सगळेच देतो ना. तेव्हा मात्र आपल्या डोक्याची नस ठणकायला लागते आणि आपण शेवटी म्हणतोच. जाऊदे ते दोन हजर रुपये ते आठच दे आणि संपव विषय. डोक्याला ताप नको. असे फंडे लावून उधारीवाला त्यातल्या त्यातही स्वतःचे दोनेक हजार रुपये वाचवतो आणि मेहेरबानी म्हणून आपले पैसे आपल्यालाच 'दान' देतो. 

रोजच्या आयुष्यात तुमच्या आमच्या कॉमन मॅन ला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं. 

ना इलाज को क्या इलाज? 

पण जर तुम्हाला कळलं की, आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांनीही उधारीचा माल घेऊन समोरच्याला मामा बनवलंय तर तुम्हाला काय वाटेल? तुमचा विश्वास बसणार नाही, बरोबर ना? शिवाजी महाराजांसारखा नीतीवंत माणूस असं कसं करू शकतो, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविकच आहे. पण, ही घटना शंभर टक्के खरी आहे. शिवरायांनी इंग्रजांकडून माल उधार घेतला होता आणि त्याचे पैसे चुकवताना इंग्रजांना अक्षरशः जेरीस आणलं होतं.  

शिवाजी महाराजांनी चक्क इंग्रजांना उधारीसाठी तंगवले
 
हा किस्सा ऐकायला मिळाला तेव्हा आधी विश्वासच बसला नाही. पण शेवटी म्हणतात ना. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. आणि हे तर स्वराज्याच्या प्रेमापोटी उभारलेलं युद्ध होतं. वेळ पडली तर लबाड्या करून आणि खोट बोलून सुद्धा आपलं वर्चस्व स्थापन करणे आणि शत्रूची ऐसीतैसी करणे हेच या सर्व राजकारणाचे मिशन होतं. पण मूळ मुद्दा हा की

नक्की काय झालं?

शिवजयंती : महाराजांची किर्ती बेफाम... 'या' कारणांमुळे शिवराय ठरतात जगातले सर्वोत्तम राजे!

तर झालं असं की,  

महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काही कारणानिमित्त तांब्याची गरज भासू लागली तर तांब्याची खरेदी ही मुंबईच्या इंग्रजांकडून केली आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे रायगडावर कॅश नाही, पण आम्हाला गोवळकोंड्यावरून खंडणी मिळते. तर तुम्ही आमच्या गोवळकोंड्याच्या ऑफिसमध्ये जा आणि तिथल्या माणसाला आमची प्रॉमिसरी नोट दाखवा म्हणजे तुमचा हिसाब मिटला. पण एवढ्या सहजासहजी हिसाब मिटवतील ते मराठे कुठले. मुंबईच्या इंग्रजांचं हेडक्वार्टर होतं सुरतेला, तिथून माणूस निघाला गोवळकोंड्याला. आजसारखं बॅग भरो निकल पडो, विमानाने भुर्रर्र उडायचे दिवस तेव्हा नव्हते. सुरत ते गोवळकोंडा हा प्रवास म्हणजे कमीत कमी १५ दिवसाचा हेलपाटा. हा हेलपाटा मारून गोऱ्यांचा माणूस गोवळकोंड्याला गेला तर त्याला कळालं की, आपल्या कागदावर सही करून पैसे द्यायची पावर असलेला अधिकारी म्हणजेच प्रल्हाद निराजी जागेवर नाहीत ते तर गेले रायगडला. झाला का घोटाळा! आता परत तो माणूस तंगड्या तोडत गेला सुरतेला आणि झालेला प्रकार सांगितला. सुरतेच्या इंग्रज साहेबाला कळून चुकलं की शिवाजी महाराजांनी आपल्याला मामा बनवलंय.

पण तांबे तर देऊन बसले होते आणि पैसे तर पाहिजे होते. त्यामुळे आता रायगडावर त्यांनी पाठवला तो आपला दुभाषी म्हणजे ट्रांसलेटर नारायण शेणवी. नारायण शेणवीला रायगडावर पाठवलं. ७-८ दिवसांचा आडवळणांचा प्रवास करून शेणवी गडावर पोचला तर त्याला कळालं की, महाराज गडावर नाहीत. म्हणून त्यांचा आदेश येईपर्यंत काहीही करता येणार नाही. शेणवीने विचारलं महाराज येणार कधी, उत्तर मिळालं माहीत नाही. महाराज कुठे गेलेत विचारलं तर उत्तर आलं आम्हाला सांगून जातात का महाराज? आता यावर काय बोलणार. तेव्हा शेवटी त्याने विचारलं की गडावर कोण आहे? तर उत्तर आलं की स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे आहेत पण सध्या त्यांना खूप काम आहे तर त्यांची कामं आवरली की तुम्ही या. असं म्हणून एक महिनाभर शेणवीला गडाखाली १ महिना थांबवला.

शेवटी त्याला वर बोलावलं आणि त्याने सगळा प्रकार मोरोपंतांना सांगितला. मोरोपंत म्हणाले, आमच्याकडे कॅश नाही. तेव्हा शेणवी म्हणाला की आम्हाला पैसे द्या आणि मोकळं करा. शेवटी होय नाही करता मोरोपंत म्हणाले की, आम्हाला तुमच्याशी व्यापार करायचा आहे. तेव्हा आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे जरी नसले तरी तेवढयाच किंमतीचा तांदूळ, नारळ आणि सुपारी आहे. आमच्या अलिबागच्या गोडाउन मधून घ्या. आता नक्की काय करायचं हे विचारायला हा नारायण शेणवी परत मुंबई ला गेला आणि त्याने त्याच्या बॉसला विचारलं काय करू? तर त्याचा बॉस म्हणाला... अरे ही मराठी माणसं पक्की लबाड आहेत. 

शिवजयंती: 'छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा'; सचिन तेंडुलकरचं खास ट्विट

तुला अलिबागच्या गोडाउनला पाठवतील आणि तिथल्या जनतेला सांगतील की अलिबागला माल ठेवू नका. दुसरीकडे टाका. हे आपल्याला असंच फिरवतील आणि पैशाच्या नावाने बोंब होईल. आता तू परत रायगडला जा आणि सरळ महाराजांनाच भेट. पाहिजे तर तुझ्याबरोबर आणखी एक इंग्रज माणूस देतो. असं म्हणून त्याच्याबरोबर फ्रान्सिस मॉली व्हेरर नावाचा एक गोरा अधिकारी दिला. दोघं परत तंगड्या तोडत रायगडला आले आणि महाराजांची अपॉईंटमेंट मागितली तर महाराज कामात आहेत म्हणून १ महिना परत दोघांना गडाखाली थांबवलं आणि मग वर बोलावलं. 

तेव्हा महाराजांनी विचारलं काय झालं? नारायण शेणवीने सगळी कुंडली परत मांडली आणि यावेळेला महाराजांना पैसे मागितले. महाराज परत तेच म्हणाले आमच्याकडे पैसे नाहीत. शेवटी होय-नाही होय-नाही करता महाराज म्हणाले की आम्हाला तुमच्याशी व्यापार करायचा आहे त्यामुळे एक उपाय सांगतो. या पैशांच्या बदल्यात तुम्हाला आम्ही चांदी आणि सोनं देतो. आता शेणवी आणि त्याच्याबरोबर आलेला तो गोरा अधिकारी दोघांकडेसुद्धा ही डील करण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे आपल्या साहेबाला विचारायला शेणवी परत मुंबईत आला. गोरा अधिकारी काही होतंय का हे पाहायला रायगडावरच थांबला. साहेबाला तोंडाकडे बघूनच कळालं की ह्याला परत शिवाजी महाराजांनी पद्धतशीरपणे चुना लावला आहे. आता सगळी कहाणी परत नारायण शेणवीने साहेबाला सांगितली. साहेब म्हणाला तू थांब, आमचा गोरा शिपाई काय करतो का पाहू. पण पंधरा दिवसांनी तो गोरा शिपाई पण काळवंडून परत आला. त्याच्याही हाताला काही लागलं नाही हे सुद्धा साहेबाला समजलं. पद्धतशीरपणे यालाही गंडा बांधला गेला.  शेवटी रोज रोज तीच स्टोरी ऐकून हा साहेब वैतागला आणि म्हणाला की हा शिवाजी काय देतोय ते घेऊन या नाहीतर नंतर हाताला काहीही लागणार नाही.

शेवटी हे परत रायगडाला आले आणि महाराजांना भेटले. आणि अगदी काकुळतीला येऊन नारायण शेणवी म्हणाला. महाराज सोनं द्या चांदी द्या पण द्या एकदाचं आणि आमची सुटका करा. महाराज म्हणाले नक्की काय पाहिजे. सोनं की चांदी?

तेव्हा फक्त डोकं आपटणं शिल्लक राहिलेला शेणवी म्हणाला महाराज चांदी द्या पण हा हिसाब मिटवा. तेव्हा चांदी द्या आणि हिसाब मिटला म्हणून ह्या शेणवीकडून लिहून घ्या असे आदेश सुटले. आता चांदी निघाली आणि तराजूतून वजन व्हायला लागलं तेव्हा हे सगळं काम करत असलेल्या मोरोपंतांनी राहून गेलेलं एक आणखी काम केलं ते म्हणजे चांदीचे रायगडावरचे भाव वाढवले.

शिवछत्रपतींच्या धाकामुळेच वसली आजची मुंबई...
 

सगळीकडे त्यावेळेला २३ रुपये शेर अशी चांदीची किंमत असताना मोरोपंतांनी चांदीचा भाव २८ रुपये किलो केला. आता २३ रुपयाने चांदी घ्यायची की २८ रुपयाने? तेवढ्यासाठी परत मुंबईला जाऊन साहेबाला विचारणं शेणव्याला परवडणारं नव्हतं. शेवटी मिळेल त्या भावाने तो ती चांदी घेऊन आला आणि त्याने शेवटी साहेबासमोर ती चांदी ठेवली. साहेबाने ईस्ट इंडिया कंपनीला रिपोर्ट लिहिला. 

"आज जवळ जवळ दीड वर्षांनी शिवाजीची उधारी मिळाली. या तांबे विक्री प्रकरणात आपल्याला २२ टक्के तोटा झाला."

म्हणजे उधारी चुकवायला दीड वर्ष लावली आणि पैसे पण कमी दिले. अशा प्रकारची चतुर चाल शिवाजी महाराजांनी इंग्रजांविरोधात खेळली. पण मनात राहून राहून हाच प्रश्न पडतो की महाराजांनी हे का केलं असावं? 

मुळात इंग्रज इथे फक्त व्यापार करायला आलेले नाहीत. हळू हळू ह्या गोऱ्या लोकांना हा देशच ताब्यात घ्यायचा आहे हे ज्या कमी व्यक्तींना कळालं होतं त्यापैकी एक छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून मिळेल त्या प्रकाराने ह्या टोपीकरांना सतावणे आणि आपली भूमी सोडून जायला भाग पाडणे हे त्यामागचे कारण होते आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वेळेला शत्रूला तलवारीनेच हरवले पाहिजे असं नाही तर आर्थिक कोंडी करूनही समोरच्याला हरवता येते हे महाराजांना माहीत होतं. गनिमी काव्याचा हा एक वेगळा अनुभव या किस्स्याच्या निमित्ताने आला. 

छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!

(वरील घटनेचा संदर्भ कै निनादराव बेडेकर यांच्या व्याख्यानातून घेण्यात आला आहे.)

rahulmahangare7@gmail.com
 

Web Title: Shivjayanti: when Chhatrapati Shivaji Maharaj keeps borrowing of british

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.