एसटीमध्ये सेवा देणार शिवनेरी सुंदरी; टोलमाफी मिळण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:17 AM2024-10-02T09:17:49+5:302024-10-02T09:18:01+5:30
बैठकीत विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एटी) संचालकांच्या बैठकीमध्ये मुंबई- पुणे मार्गावरील ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना आदरातिथ्य सेवा देणारी शिवनेरी सुंदरी नेमण्याचा ठराव मंजूर झाला आहे. प्रवाशांच्या तिकिटावर याचा कोणताही अधिभार लागणार नसल्याचे एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०४ वी बैठक मंगळवारी झाली.
बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडळाचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत विविध खात्यांच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. एसटीला महाराष्ट्रामध्ये टोलमाफी मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठरावदेखील बैठकीमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बसस्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. प्रवाशांबरोबरच आसपासच्या नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील ४०० ते ५०० चौ.मी.ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच त्या संस्थेमार्फत आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व मेडिकल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे.
आगारांची संख्या २५३ होणार
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासीबहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून, या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे.
नवीन २,५०० साध्या बस खरेदी करणार
एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटांना स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारून १० बाय १० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवीन २,५०० साध्या बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच १०० डिझेल बसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे, अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.