इम्तियाज जलील यांच्या गुन्हा नोंदवण्याची शिवभक्तांची मागणी; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:36 IST2024-10-01T15:34:56+5:302024-10-01T15:36:04+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशनबाहेर सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

इम्तियाज जलील यांच्या गुन्हा नोंदवण्याची शिवभक्तांची मागणी; काय आहे प्रकरण?
शिर्डी - अहमदनगर जिल्ह्यातील राहता पोलीस स्टेशनसमोर शिवभक्तांनी आणि सकल हिंदू समाजाने आंदोलन केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तिरंगी रॅली निघाली होती. या रॅलीवेळी अनेक भागात छत्रपती संभाजीनगर फलकांना काळे फासण्याचा प्रकार घडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
याबाबत राहता पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवभक्तांनी म्हटलं की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळं फासण्याची हिंमत शिवरायांच्या भूमीत केली. त्याविरोधात तात्काळ इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी सकल हिंदू समाज आणि शिवभक्तांच्या वतीने राहता पोलीस स्टेशनबाहेर जमलो आहोत. पोलिसांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असं त्यांनी सांगितले. तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गोळवाडी फाटा, जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा, महिको कंपनी, शेलगाव ब्रिज, मात्रेवाडी यासह इतरत्र फलकांना काळे फासून विद्रूप केल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
तर आज राज्यभरात शिवशंभू भक्त छत्रपती संभाजीराजेंचे मावळे ठिय्या आंदोलन करतायेत. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर ते ठाण्यापर्यंत तिरंगा यात्रा काढली. एका हातात तिरंगा धरायचा आणि दुसऱ्या हाताने आमचे दैवत छत्रपती संभाजीराजेंचा द्वेष करायचा. हे औरंग्याची पिल्लावळ करू शकतात. छत्रपती संभाजीराजेंनी इस्लाम स्वीकारला नाही त्याचा राग त्यांच्या मनात आहे. तिरंगा यात्रेतून हा द्वेष दिसून आला. जलील यांना अटक करावी अशी मागणी शिवभक्तांची आहे. त्या मागणीला माझाही पाठिंबा आहे असं विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनीही महाराष्ट्र सरकारकडे ४ प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात रामगिरी महाराज यांना अटक केली जावी, नितेश राणेंविरोधात कारवाई व्हावी, कुणीही कुठल्याही धर्माविरोधात बोलले तर त्याच्यावर कारवाई व्हावी तसेच मौलाना सलमान अजहरी यांना सोडण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे जलील यांनी केली आहे.