सह्याद्रीचा अंगार! अन् अवघ्या काही क्षणात पुन्हा अवतरले छत्रपती संभाजी; पाहा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा पडद्यामागचा थरार…
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 09:11 AM2022-12-28T09:11:43+5:302022-12-28T09:13:39+5:30
बाळ इथं निजला, शिवाचा बाळ इथं निजला…पुढे फक्त २ मिनिटांचा वेळ अन् छत्रपती शंभूराजे पुन्हा रंगमंचावर…अंगावर शहारे आणणारा Video
शिवपुत्र संभाजी महानाट्यातील अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हे महानाट्य औरंगाबादमध्ये सुरु आहे. या नाट्यातील शेवटच्या प्रसंगाचा एक पडद्यामागचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यावर हे महानाट्य आधारित आहे. 'शिवपुत्र संभाजी हे महानाट्य संपत असताना संभाजी यांच्या बलिदानानंतर अवघ्या काही वेळात पूर्ण भरजरी पेहरावातले शंभूराजे पुन्हा प्रेक्षकांसमोर येतात. बाळ इथे निजला, शिवाचा बाळ इथे निजला हे गाणे सुरु असते, प्रेक्षक भावूक झाले असताना पडद्यामागे वेगळी गडबड सुरु असते. सर्व लहान मुलांच्या पुढील पिढीच्या नजरेत हे राजबिंडे छत्रपती संभाजी महाराजच राहिले पाहिजेत' त्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम केल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर अमोल कोल्हे पडद्यामागे जातात. आधीचा रक्तबंबाळ अवस्थेतील पेहराव काढून त्यांची टीम लगेच त्यांना पुन्हा शंभुराजांचा पेहराव देते, मेकअप केला जातो, दागिने घातले जातात आणि अमोल कोल्हे पुन्हा घोड्यावर बसून प्रेक्षकांसमोर येतात. हे सर्व अवघ्या २ मिनिटांत साकारले जाते जे बघून सर्वांच्या अंगावर काटा येईल हे नक्की. पुढच्या पिढीला स्वराज्याचा हा धगधगता इतिहास कळावा यासाठी हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे.
शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग सध्या २३ ते २८ डिसेंबर औरंगाबाद येथे सुरु आहे. तर येत्या २१ जानेवारी पासून नाशिक मध्ये या महानाट्याचा थरार रंगणार आहे.