‘अल्झायमर’वर ‘इंट्रानेझल स्प्रे’चा उपचार!; नांदेडच्या शिवराज नाईकने लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:15 AM2020-08-11T07:15:27+5:302020-08-11T07:15:37+5:30
‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ अवॉर्डने गौरव
नांदेड : मेंदुशी निगडीत अल्झायमर या आजारावर प्रभावी उपचार करण्यासाठी नॅनो टेक्नॉॅलॉजीवर आधारीत इंट्रानेझल स्प्रेची निर्मिती करण्यात जिल्ह्यातील कल्हाळी येथील शिवराज नाईक या युवा संशोधकास यश आले आहे़ या कार्याबद्दल त्यांचा यावर्षीच्या ‘गांधीयन यंग इनोव्हेशन ’ अवॉर्डसाठी निवड झाली आहे़
देशातील १५ विद्यार्थ्यांना यंदा राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे़ यामध्ये महाराष्ट्रातून शिवराज एकमेव आहेत. १५ लाख रुपये रोख, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नांदेड शहरातील बाबानगर येथील महात्मा फुले हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेले शिवराज सध्या भारतीय रसायन तंत्रज्ञान (आयसीटी) संस्था माटुंगा, मुंबई येथे रिसर्च स्कॉलर म्हणून कार्यरत आहेत. कंधार तालुक्यातील कल्हाळी येथील ३५ हुतात्म्यांच्या हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे कर्णधार हुतात्मा अप्पासाहेब नाईक यांच्या परिवारातील ते सदस्य आहे.
१९१० साली ‘अल्झायमर’ आजाराचा शोध लागला आहे़ मात्र अद्यापही यावर ठोस उपचार पद्धती उपलब्ध झालेली नाही़ या आजारामध्ये मेंदूमधील ‘न्युरॉन’ हळूहळू नष्ट होऊ लागतात़ परिणामी व्यक्तीच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो़ तसेच मेंदूचे कार्य थांबत जावून मृत्यूही ओढावतो़
अशा रुग्णांसाठी विकसित देशात ‘केअर टेकर’ ठेवले जातात़ मात्र आपल्याकडे ते परवडणारे नाही़ सध्या स्मृतीदोषावर तोंंडावाटे घेण्याची चार औषधे उपलब्ध आहेत़ परंतू मेंदू आणि तोंडाच्यामध्ये ‘ब्लड ब्रेन बॅरीअर’ हा पडदा असतो़
हा पडदा तोंडावाटे घेतलेले औषध मेंदूपर्यंत पोहचू देत नाही़ त्यामुळे सध्यातरी उपरोक्त चारही औषधांची उपयुक्तताही १ टक्क्यांपेक्षा कमी आहे़ त्यामुळेच मेंदूपर्यंत औषध पोहचविण्यासाठी शिवराज यांनी या ‘इंट्रानल’ स्प्रे’ची निर्मिती केली आहे़ या स्प्रेची ‘प्री क्लिनिकल’ चाचणी पूर्ण करण्यात आली असून, ‘क्लिनिकल टेस्ट’साठी प्रयत्न सुरू आहेत़ ‘क्लिनिकल टेस्ट’मध्येही विविध प्रकारच्या चार पायऱ्या आहेत़ मात्र यासाठी मोठ्या मनुष्यबळासह निधीचीही गरज असते़ त्यामुळे शासन तसेच मल्टीनॅशनल कंपन्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे शिवराज यांनी सांगितले़
पुरस्कार निवड समितीने घेतलेल्या तीनही चाचण्यांमध्ये हा स्पे्र अव्वल ठरला आहे़ प्रयोगशाळेतील हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष लोकांच्या उपयोगासाठी यावे़ यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत़ या संशोधनासाठी माटुंग्यातील आयसीटी संस्थेच्या प्राध्यापक वंदना पत्रावळे यांचे मार्गदर्शन लाभले़
- शिवराज नाईक, रिसर्च स्कॉलर