शिवरायांचे व्यक्तीमत्व बहुआयामी - नरेंद्र मोदी
By admin | Published: December 24, 2016 06:22 PM2016-12-24T18:22:31+5:302016-12-24T18:40:03+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर या क्षणी मला अत्यंत आनंदाची अनुभूती होत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर या क्षणी मला अत्यंत आनंदाची अनुभूती होत आहे. 2014 मध्ये भाजपाने निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यावेळी सर्वप्रथम मी रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले असे नरेंद्र मोदींनी वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभेमध्ये बोलताना सांगितले.
शिवरायांचा जीवनपट प्रेरणादायी असून, त्यांच्या व्यक्तीमत्वातून भरपूर काही शिकण्यासारखे असल्याचे मोदींनी सांगितले. शिवाजी महाराज शूर, वीर होते. संघर्षाच्या काळातही त्यांनी सुशासन सुरु ठेवले. त्यांनी सुशासनाची उत्तम परंपरा घालून दिली. मावळयांची मोट बांधून स्वराज्याचा लढा उभारला, शिवाजी महाराजांकडे उत्तम संघटनकौशल्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्याच्या नियोजनाचे केलेले काम आजही प्रेरणादायी, शिकण्यासारखे आहे असे मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी आरमाराचे महत्व ओळखले आणि आरमाराची स्थापना केली. मुद्रा निर्मितीचे कामही महाराजांनी परदेशी हातात जाऊ दिले नाही. त्यामुळे काय धोके निर्माण होऊ शकतात हे ओळखून मुद्रा निर्मितीचे कार्यही स्वराज्यातच केले. शिवरायांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. आज मला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाची संधी मिळाली त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा, सरकारचा आभारी आहे असे मोदी म्हणाले.