रायगडावर मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन
By admin | Published: June 1, 2017 03:30 AM2017-06-01T03:30:06+5:302017-06-01T03:30:06+5:30
किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवारी (दि. ६) शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे मंगळवारी (दि. ६) शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र व देशभरातून लाखो शिवभक्त सामील होण्यासाठी येणार आहेत. सोमवार (दि. ५) व मंगळवार (दि. ६) असे दोन दिवस या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. सोहळ्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेसाठी स्थानिक पदाधिकारी रघुवीर देशमुख, प्रशांत दरेकर आणि संभाजी ब्रिगेडचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैभव शेडगे आदी उपस्थित होते. गडावर निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांसाठी एक लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली तरीही शिवभक्तांनी आपल्याबरोबर किमान तीन लिटर पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. पायथ्याला वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. ते फुल्ल झाल्यानंतर पाचाडच्या आधीच वाहने थांबविण्यात येतील. तसेच पाचाड येथून चित्तदरवाजापर्यंत पाच मिनी बसेसची मोफत सेवा उपलब्ध आहे. ५ जून रोजी सायंकाळी गडावर अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी गडाच्या पायथ्याशी टी पॉइंट येथे प्रथमच दुसरे अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ५ जूनपासून गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
रायगड संवर्धनाचा संकल्प
राज्य शासनाने किल्ले रायगड संवर्धनाचा संकल्प सोडला आहे. किल्ले रायगडचे संवर्धन कशा प्रकारे व्हावे याबद्दल सामान्य शिवभक्तांची मते जाणून घेण्यासाठी गडावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात सामान्य शिवभक्तांची मते ऐकून घेतल्यानंतर युनेस्कोच्या उपसंचालक डॉ. शिखा जैन, रीमा हुजा, बी.व्ही. खरबडे, राकेश माथूर, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, ए.के.सिन्हा, डॉ. के.पी. पुनाच्चा, ए.आर.रामनाथन,राहुल समेळ, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, पर्यावरण तज्ज्ञ मधुकर बाचुळकर आपली मते व्यक्त करणार आहेत.