मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 01:27 PM2020-06-06T13:27:41+5:302020-06-06T13:30:02+5:30
अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून ह्रदयाच्या कोंदणात जपलेला शिवराज्याभिषेक दिन सोहळा शनिवारी मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत रायगडावर साजरा झाला.
रायगड/कोल्हापूर : अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून ह्रदयाच्या कोंदणात जपलेला शिवराज्याभिषेक दिन सोहळा शनिवारी मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत रायगडावर साजरा झाला. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती अनेक संकटावर मात करत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकण्याचा महापराक्रम केला, तोच आदर्श आणि परंपरा डोळ्यासमोर ठेऊन कोरोना संसर्गाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात सुध्दा रायगडावर जाऊन छत्रपतींच्या या मावळ्यांनी शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्याची परंपरा राखली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन समितीच्यावतीने २००७ पासून शिवराज्याभिषक दिन सोहळा साजरा केला जात असून गेल्या बारा तेरा वर्षात या सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप येत आहे. सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मावळ्यांची संख्या वर्षागणिक वाढतच आहे. परंतू यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनची स्थिती याचा विचार करुन यावर्षी हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय सोहळा समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला होता. छत्रपतींचा आदर्श आणि शासनाचे आदेश याचे तंतोतंत पालन करत हा सोहळा ठरल्याप्रमाणे साधेपणाने पार पडला.
पावसाची रिपरिप आणि दाट धुक्याने रायगडावर शनिवारची पहाट झाली. गडाला दाट धुक्याचा वेढा खूप वेळ राहिला. पाऊस आणि धुक्याला सुध्दा हा सोहळा पाहण्याची आस लागली असावी असेच तेथील वातावरण होते. नगारखान्यासमोर यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तेथूनच शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास सुरवात झाली. ध्वजारोहण झाल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती, यौवराज शहराजीराजे छत्रपती यांनी उत्सव मूर्ती घेऊन राजसदरेकडे प्रस्थान केले. यावेळी अखंड जयघोष झाला. जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी रायगडाचा आसमंत भेदला.
राजसदरेवर येताच संभाजीराजे व शहजीराजे यांनी मेघडंबरीतील छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. दोघांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास जलाभिषेक व सुवर्णनाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी देखील मोजक्या मावळ्यांनी छत्रपतींच्या नावाचा जयजयकार केला. असंख्य तरुणांना अखंड स्फुर्ती देणाऱ्या रायगडावरील शांत, आल्हाददायक वातावरण या घोषणांनी भेदले. हा सोहळा अवघ्या २५ जणांच्या उपस्थिीत पार पडला. १२ पोलिस सुध्दा बंदोबस्तावर होते. सोहळ्यात समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, विनायक फाळके, वरुण भामरे, संजय पोवार सहभागी झाले होते.
रायगड जिल्ह्याला आर्थिक पॅकेज जाहीर करावे
शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडताच खासदार संभाजीराजे छत्रपती जमलेल्या मावळ्यांसमोर मार्गदर्शन करतात. ही परंपरा कायम ठेवत संभाजीराजेनी उपस्थितांशी संवाद साधला. निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला असून या जिल्ह्यास मोठे आर्थिक पॅकेज सरकारने जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. रायगड परिसरातील २१ गावांकरिता एक सुसज्ज व सर्व सोयीनियुक्त असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभाण्यात येईल, अशी ग्वाही सुध्दा संभाजीराजेंनी यावेळी दिली.
फेसबुक लाईव्ह वरुन प्रक्षेपण
कोरोना संसर्गाच्या भितीमुळे हा सोहळा साधेपध्दतीने साजरा करण्याचे तसेच घरोघरी साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजेंनी केले होते. रायगडावर साजरा केल्या जाणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे सर्वांना घरबसल्या दर्शन व्हावे म्हणून त्याचे फेसबुक लाईव्ह वरुन त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
फोटो क्रमांक - ०६०६२०२०-कोल-शिवराज्याभिषेक दिन सोहळा०१
ओळ - अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीच्यावतीने शनिवारी रायगड येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात खासदार संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहराजीराजे छत्रपती यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक व सुवर्णनाण्यांचा अभिषेक घातला.
फोटो क्रमांक - ०६०६२०२०-कोल-शिवराज्याभिषेक दिन सोहळा०२
ओळ - किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहराजीराजे छत्रपती यांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.