शिवस्मारक हे जगात ओळख बनेल - मुख्यमंत्री
By admin | Published: December 25, 2016 03:02 AM2016-12-25T03:02:33+5:302016-12-25T03:02:33+5:30
‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ ही जशी अमेरिकेची ओळख आहे तसे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ही महाराष्ट्र आणि देशाची ओळख जगात बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
मुंबई : ‘स्टॅच्यू आॅफ लिबर्टी’ ही जशी अमेरिकेची ओळख आहे तसे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ही महाराष्ट्र आणि देशाची ओळख जगात बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला.
वांद्रे-कुर्ला संकुलाच्या एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. अठरापगड जातींचे मावळे सोबत घेऊन शिवाजी महाराज मुगलांवर तुटून पडले होते. अशाच सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून राज्याचा विकास आपले सरकार करीत असून ज्या छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला सत्ता मिळाली त्यांचे आम्ही सेवक आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जो देश आपला इतिहास विसरतो त्याला वर्तमान तर असू शकतो मात्र, भविष्य असू शकत नाही, या शब्दांत शिवस्मारकाच्या उभारणीचे जोरदार समर्थन मुख्यमंत्र्यांनी केले. शूरता, नम्रता, प्रशासकीय कौशल्य असे अनेकविध गुण असलेले शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहेत. आम्ही कोणीही ‘शिवा’ होऊ शकत नाही पण ‘जिवा’ (जिवा महाला) होण्याची संधी द्यावी, अशी प्रार्थना मी आई तुळजाभवानीच्या चरणी करतो, असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. भूूमिपूजन होत असलेल्या मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे सामान्य माणसांचे जीवन सुखकर होईल. असे सांगून या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या विविध परवानग्या तत्काळ दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे त्यांनी आभार मानले.
किल्ल्यांचा विकास करू -उद्धव
शिवरायांचे नाव घेताच मुडदाच काय पण दगडही उभे राहतील. ते महाराष्ट्राचे दैवत होते आणि आहेत. त्यांचे भव्य स्मारक उभारणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते. सरकारमध्ये आम्ही सोबत आहोत आणि जगाला प्रेरणा मिळेल, असे हे स्मारक उभे राहील, अशा माझ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील गडकिल्ले केंद्रीय पुरातत्व विभागापासून मुक्त करून राज्य शासनाकडे द्या, अशी माझी पंतप्रधान मोदींकडे मागणी आहे. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नौसेनेकडे असलेली सुमारे ९०० एकर जागा वापरात नाही. त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांचे संग्रहालय व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
शिवसैनिकांची धरपकड
शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वत: पंतप्रधानांसोबत शिवस्मारकाच्या सोहळ्यात सहभागी असतानाही शिवसैनिकांना अभय मिळाले नाही. हा सोहळा पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीबाहेर गर्दी करणाऱ्या शिवसैनिकांच्या एका गटाला ताब्यात घेत पोलिसांच्या गाडीत कोंबण्यात आले. चौपाटीसमोरील दुकानंही बंद करण्यास भाग पाडण्यात आल्याने कोणत्याही गोंधळाविना हा सोहळा शांततेत पार पडला.
पोलिसांची दमछाक
चौपाटी फिरण्यासाठी आलेल्या अनेकांचा येथे आल्यावर पोलीस बंदोबस्त पाहून हिरमोड होत होता. त्यातही काही हौशी सोहळा अथवा मान्यवरांची एखादी झलक पाहण्यासाठी धडपडत होते. अशांना आवरताना पोलिसांची
मात्र पुरती दमछाक होत होती.