Aaditya Thackeray : "युवासैनिकांनो, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची हीच ती वेळ"; आदित्य ठाकरेचं नवं ट्विट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:59 PM2022-07-16T13:59:47+5:302022-07-16T14:09:31+5:30
Shivsena Aaditya Thackeray : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी, असं आवाहन केलं आहे.
मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी तर पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट केलं आहे.
राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागात मदत करावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करण्यात आले आहे. ""युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा... सर्वसामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे... जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची "हीच ती वेळ"" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
युवासैनिकांनो!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2022
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा... सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे... जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची "हीच ती वेळ".
राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी तो जास्तच झाल्यामुळे तेथील पिकांची हानी झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला. राज्याच्या १४ जिल्ह्यांत ५१ तालुक्यांमधील काही क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. यात धुळे, जळगाव, लातूर, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मका, उडीद, तूर, काही ठिकाणी हळदी पिकाचेही नुकसान झाले. नागपूरमधील संत्र्यांच्या बागा, अन्य काही तालुक्यांमधील फळबागाही जास्तीच्या पावसाने बाधित झाल्या आहेत. महसूल विभागाच्या साह्याने पंचनामे करण्यात येत आहेत.