Aaditya Thackeray : "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार"; आदित्य ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:37 PM2022-08-08T14:37:02+5:302022-08-08T14:48:01+5:30
Shivsena Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील नव्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी "कधी माईक खेचला तर कधी चिठ्ठी, राज्यात 2 लोकांचं जम्बो सरकार" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे... खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे" असंही म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर कांदिवली आणि बोरिवलीमधील कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
"राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही"
"मला ताप आला आहे त्यामुळे मी अधिक बोलत नाही. राज्यात लोकांनी निवडलेले सरकार राहिले नाही. आता राज्यात 2 लोकांचे जम्बो सरकार आहे. कधी माईक खेचला जात आहे, कधी चिठ्ठी दिली जाते. राज्यात पूरपरिस्थिती आहे पण कोणाचे लक्ष नाही. हे सरकार तात्पुरती आहे. हे सरकार पडणार आहे. राज्याचा विकास थांबला आहे, घाणेरडे राजकारण सुरू आहे. खांद्याला खांदा लावून आपल्याला लढायचे आहे. आपण जिंकणार हे निश्चित. न्यायालयाच्या निकलानंतर इतर देशात स्थिरता की अस्थिरता हे समजेल" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.