Aaditya Thackeray : "कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 11:26 AM2022-07-03T11:26:48+5:302022-07-03T11:41:08+5:30
Shivsena Aaditya Thackeray : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडूनराहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवी हे दोन उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याच दरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का?" असा खोचक सवाल विचारला आहे.
आदित्य ठाकरे यांनी "इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोणी पळणार आहे का? एवढा बंदोबस्त कशासाठी?" अशी विचारणा केली आहे. तसेच एवढा बंदोबस्त हा पहिल्यांदा आहे. आमदारांमध्ये आणि मीडियामध्ये कधी दोरी लावण्यात आली नव्हती. एवढी भीती कशाला? कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
"शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे" असंही आदित्य यांनी सांगितलं. "आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. आम्हाला धोका दिला ठीक आहे, पण मुंबईकरांना धोका देऊ नका. आरेचं जंगल मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आरेला देखील दोन पर्याय आहेत, एक कांजूरमार्ग आणि दुसरा पहाडी गोरेगाव. मुंबईकरांचा, आमच्या सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे" असं देखील आरे कारशेडचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.