Aaditya Thackeray : "बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही; धनुष्यबाण हा आपलाच राहणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 03:32 PM2022-06-26T15:32:34+5:302022-06-26T15:40:15+5:30
Shivsena Aaditya Thackeray : बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपामध्ये विलीन होणं हेच पर्याय असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई - शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत तब्बल 40 हून अधिक आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी आपला 'ठाकरी बाणा' दाखवला आहे. बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला आहे.
"बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, धनुष्यबाण हा आपलाच राहणार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. यासोबतच प्रत्येक आमदार जरी तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "उद्धवजींनी मोह सोडलाय, जिद्द, ताकद नाही. आम्हीच शिवसेना, बाळासाहेब ठाकरे नाव लावतात. तुमची लायकी असती तर सुरतमध्ये पळाला असता?बंड ठाण्यात बसून मुंबईत बसून केलं असतं. महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले. एकाने विचारलं आदित्यजी कसं वाटतंय मी म्हटलं, लोकांचं प्रेम दिसतंय. पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कुठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे असा टोला त्यांनी लगावला. सांताक्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते.
संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात गेल्यावर सभेत उठून एका शेतकऱ्याने मला सांगितले की भुमरे पाच टर्म आमदार झाले आहेत, त्यांना मंत्रीपदाची संधी द्या. त्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोललो. धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपामध्ये विलीन होणं हेच पर्याय असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? पण जे झालं ते झालंच. बंडखोरांना माफी नाही. महत्त्वाची खाती होती, पक्षात वजन होतं इथे मानसन्मान मिळत होता. स्वतः विकलेलो नाही विकणारही नाही. ज्यांना जायचंय दरवाजे खुले आहेत. काय होते तुम्ही आणि काय जोक झालाय तुमचा. जिथे पूर आलाय लोकांना खायला अन्न नाही अशा ठिकाणी तुम्ही मजा मारायला जाता? संरक्षण काश्मिरी पंडितांना द्यायला हवी ती कुठे वापरली जातेय. चार्टर्ड प्लेन, हॉटेलचा खर्च किती असेल, अपहरण केलेल्या आमदारांना कपडे देण्याचं बिल किती असेल. G20 मध्ये जेव्हा आपल्या देशात लोक येणार तेव्हा त्यांना वाटेल इथे लोकशाही आहे की नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपावर केला.