भाजपाचं मुंबईवर बेगडी प्रेम; अमित शाहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 11:27 AM2022-09-05T11:27:54+5:302022-09-05T11:28:43+5:30
राज्यपालांकडे असणाऱ्या विषयांबाबत गेली २-३ वर्ष पाठपुरावा केला ते निर्णय आता राज्यपाल २-३ मिनिटांत घेतायेत असं दानवेंनी म्हटलं.
नाशिक - अमित शाह गणपती दर्शनासाठी आलेत, परंतु मुंबईचं महत्व कमी कसं होईल? हे पाहिलं जात आहे. मुंबईवर भाजपाचं बेगडी प्रेम आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. त्याचसोबत सामना हे ज्वलंत विचारांचं वर्तमानपत्र आहे. त्याचे विचार महाराष्ट्रपुरते मर्यादित राहत नाहीत तर देशपातळीवर विचार जातात. ज्वलंत विचार वर्तमानपत्रातून व्यक्त करतात असंही म्हटलं आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत आलेत. परंतु मुंबईचं महत्व कसं कमी होईल? मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं. मुंबईतील अनेक कार्यालयात अहमदाबादला नेले. याचा अर्थ मराठी माणूस, मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु महाराष्ट्राने सातत्याने यावर मात केली आहे असं त्यांनी सांगितले.
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात दाद मागू
विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे नावांची यादी पाठवली होती. परंतु ती यादी राज्यपालांनी रद्द केली. त्यावर दानवेंनी टोला लगावला आहे. राज्यपालांकडे असणाऱ्या विषयांबाबत गेली २-३ वर्ष पाठपुरावा केला ते निर्णय आता राज्यपाल २-३ मिनिटांत घेतायेत. फार कार्यतत्परतेने निर्णय घेतले जात आहेत. राज्यपालांनी मागील सरकारने दिलेली १२ जणांची शिफारस यादी रद्द केली त्याबाबत निश्चित कायदेशीर भूमिका घेऊ असं त्यांनी म्हटलं.
शिवसेना निवडणुकीच्या मैदानात दिसेल
सामना अग्रलेखातून भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख केल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी आम्ही तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेग्विन सेना म्हणायचं का? असा चिमटा शेलारांनी काढला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर देत सांगितले की, शिवसेना कुठली सेना हे निवडणुकीच्या मैदानात दिसेल. महाराष्ट्र विरोधक असो वा आशिष शेलारांना शिवसेना काय आहे ते स्पष्ट दिसेल असं म्हटलं आहे.