शिवसेना आनंद दिघेंची नाही; तर स्वार्थी, घराणेशाहीची

By admin | Published: February 20, 2017 06:06 AM2017-02-20T06:06:24+5:302017-02-20T06:06:24+5:30

ठाण्यातील शिवसेना ही आता आनंद दिघे यांची राहिली नसून ती स्वार्थी लोकांची आणि घराणेशाहीची शिवसेना बनल्याची घणाघाती

Shivsena Anand Dighane is not; So selfish, dutiful | शिवसेना आनंद दिघेंची नाही; तर स्वार्थी, घराणेशाहीची

शिवसेना आनंद दिघेंची नाही; तर स्वार्थी, घराणेशाहीची

Next

ठाणे : ठाण्यातील शिवसेना ही आता आनंद दिघे यांची राहिली नसून ती स्वार्थी लोकांची आणि घराणेशाहीची शिवसेना बनल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या सभेत केली. या घरणेशाहीवाल्यांनी आपल्याच घरातल्यांना तिकिटे देऊन शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला.
वेगवेगळ्या पक्षांतील फुटीर हे बिभीषण आहेत. त्यांना रावणाची लंका नष्ट करायची आहे, असे सांगत त्यांनी आयारामांना पक्षात घेतल्याचे समर्थन केले आणि त्यांच्या मदतीने या रावणरूपी शिवसेनेचे दहन करा, असा संदेश त्यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. मतदारांनीही या धर्माच्या लढाईत कृष्णाप्रमाणे भाजपाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
ठाण्यातील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पटांगणावर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिवसेनेतील घराणेशाहीची यादीच वाचून दाखवली.
ठाण्यात एखादा अपवाद म्हणून मुलाला अथवा इतरांना तिकीट देणे ठीक होते. परंतु, आपल्या मुलाचे काहीच काम नसताना किंवा कुटुंबातील इतर सदस्याचे पक्षासाठी, मतदारांसाठी काहीच योगदान नसतानाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावाला आणि इतर तिघांना, सरनाईक यांनी पत्नी, मुलगा आणि आपल्या पीएला, राजन विचारे यांनी दोन, एच.एस. पाटील यांनी तीन अशा पद्धतीने घराणेशाहीतच तिकिटे बळकावली आहेत. त्यामुळे ही शिवसेना आता घराणेशाहीवाल्यांची शिवसेना झाल्यानेच त्यांच्याशी युती केली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ठाणे हे तुमच्या दावणीला बांधलेले नसून त्यावर आमचाही हक्क आहे, असे फडणवीस यांनी शिवसेनेला बजावले. पूर्वी ठाणे जिल्ह्यावर भाजपाचेच वर्चस्व होते. परंतु, ज्या वेळेस राष्ट्रवादाचा मुद्दा निर्माण झाला, त्या वेळी आम्ही कोणत्याही पदाची अपेक्षा न करता शिवसेनेला मदत करीत गेलो. त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. आता ठाण्यात संजय केळकर यांच्या रूपाने कमळ फुलले असून इतर तीन मतदारसंघांतही आम्ही चांगली मते मिळवली आहेत. त्यामुळे आता महापालिकेतही परिवर्तनाची गरज असून ते आम्ही करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
शिवसेनेचे दहन करा
शिवसेना हा रावण असून या रावणाचे दहन करण्याची वेळ आल्याचा दावा त्यांनी केला. त्यासाठी संजीवनी देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना त्यांनी हनुमानाशी केली. आयारामांची तुलना बिभीषणाशी केली. हनुमान जेव्हा लंकेत सीतामाईला आणण्यासाठी गेले, त्या वेळी त्यांनी संपूर्ण लंका पेटवली होती.
त्यांना त्याच वेळी बिभीषणाचे महत्त्व पटले होते. ते त्यांनी रामाला सांगितले आणि बिभीषणाला आपलेसे केले होते. आता हेच बिभीषण आम्हीही आपलेसे केले आहेत. कार्यकर्त्यांनो, तुम्ही हनुमान असून आता तुम्हाला या रावणाचे दहन करायचे आहे. आता पेटून उठा, असे सांगत नाराज पदाधिकाऱ्यांना उभारी देण्याचे काम फडणवीस यांनी केले.
मी महाभारतावर नाही, तर रामायणावर बोलणार आहे, असे सांगतासांगता त्यांनी नंतर मतदारांना कृष्णाची उपमा दिली आणि ‘यदा यदाही धर्मस्य’ म्हणत ठाणे महापालिका जिंकण्यासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांना केले.
‘त्यांची दिव्याचीही लायकी नाही’
शिवसेनेची तुलना सूर्याशी करू नका, ते दिव्याच्याही लायकीचे नाहीत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. महापालिका कशासाठी चालते, कोणाच्या भरवशावर चालते, याचे दाखले देत, आयुक्त हे काम करीत असतात. परंतु, केवळ त्यांच्या भरवशावर कामे होत नाहीत, यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती या सर्वांचा मोठा वाटा असतो. परंतु, शिवसेनेने महापालिकेला एक दुकान केले असून निवडून आल्यानंतर बिल्डारांना ब्लॅकमेल करून या दुकानातून किती लुटता येईल, याचाच विचार त्यांनी केला असल्याचीही टीका त्यांनी केली.
सत्ताधाऱ्यांना महापालिका ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी वाटत असून सत्ता हेच साध्य वाटत आहे. परंतु, सत्ता हे आमचे साध्य नसून साधन आहे. आता
या सर्वांना धडा शिकवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे.
च्समाजाचे कल्याण न करता स्वत:चेच कल्याण करण्याचे काम ठाण्यात गेली २५ वर्षे सुरू असून आता भ्रष्टाचाराचे भाग होऊ नका, असे आवाहन करत त्यांनी मतदारांना आता सत्ता द्या, असे आवाहन केले.

दडपशाहीवर टीका

गुंडांच्या दडपशाहीला घाबरू नका. वेळ पडल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्या, असा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. कोणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या, असे सांगितले. ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्या २२ पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, त्यांचे मी आभार मानतो. आता ही अटीतटीची वेळ असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने भाजपाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी आर्त हाक त्यांनी आपल्या नाराज कार्यकर्त्यांना घातली आणि त्यांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Shivsena Anand Dighane is not; So selfish, dutiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.