Bhaskar Jadhav : "किरीट सोमय्यांचा स्टॉक संपलाय म्हणून नव्या माणसाला आणलंय"; भास्कर जाधवांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:10 PM2022-08-17T18:10:39+5:302022-08-17T18:22:12+5:30
Shivsena Bhaskar Jadhav Slams BJP : "महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 125 माणसं या अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेली आहेत."
मुंबई - भाजपाचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार" असं ट्विट केलं आहे. यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. यावर आता शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "किरीट सोमय्यांचा स्टॉक संपलाय म्हणून नव्या माणसाला आणलंय" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
भास्कर जाधव यांनी "भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचा मराठी लोकांवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप करता करता, ईडीची चौकशी लावता लावता स्टॉक आता संपला आहे. म्हणून त्यांनी मोहित कंबोज नावाच्या एका नव्या, दुसऱ्या माणसाला समोर आणलं आहे. जो काही अत्याचार होतोय, अन्याय होतोय, ईडीची कारवाई सर्वांवर होतेय हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रची जनता पाहतेय. योग्य वेळी महाराष्ट्राची जनता यांना उत्तर देईल" अशा शब्दांत निशाणा साधला आहे.
"महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 125 माणसं या अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेली आहेत. महाराष्ट्रातल्या काही भागात पाऊस कमीच पडला. या पार्श्वभूमीवर सरकारने योग्य पावल उचलायला हवी होती. तात्काळ मदतीचा निर्णय घ्यायला हवा होता. पण मदत मिळाली नाही. केवळ घोषणा केल्या. त्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही" असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
"मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100%; पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत"
"मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100%" असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी देखील समर्थन केलं आहे. मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100% आहे. पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत. पूर्ण पुराव्यांनिशी ते बोलतात. आजपर्यंत त्यांनी पुराव्यांच्या आधारेच भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडलेत. त्यांचं ट्विट अधिक महत्त्वाचं आहे. कोणाला तुरुंगात टाकण्याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळायला हवं. पण कंबोज यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी तेच केलं आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.