ठाण्यात रागगड गल्ली भागात शिवसेना भाजपा कार्यकर्ते भिडले
By Admin | Published: February 21, 2017 01:15 AM2017-02-21T01:15:53+5:302017-02-21T01:15:53+5:30
ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या गटाकडून रात्री उशिरा प्रचार सुरु असून, ते लोकांना प्रलोभने दाखवित असल्याचा
ठाणे, दि. 21 - ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या गटाकडून रात्री उशिरा प्रचार सुरु असून, ते लोकांना प्रलोभने दाखवित असल्याचा आरोप भाजपचे नारायण पवार यांनी केला. याच कारणावरुन उभय गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून दोन्ही गटातील जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी सौम्य लाठी हल्ला करावा लागल्याची घटना सोमवारी रात्री 10वा. च्या सुमारास घडली. अर्थात कोणाचीच तक्रार न आल्याने कोणाही विरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतांना शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते सोमवारी रात्री रायगड गल्लीत एकमेकांसमोर भिडले. विचारे हे आपल्या समर्थकांसह नारायण पवार यांच्या कार्यालयाजवळून जात होते. त्याचवेळी ते लोकांवर प्रभाव पाडीत असून त्यांना प्रलोभने दाखवित असल्याचा आरोप पवार यांनी केला. यातूनच उद्भवलेल्या वादातून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. दोन्ही गटांमध्ये तणाव वाढत असतांनाच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. औरंगाबाद राज्य राखीव पोलीस दलाच्या कुमकसह मोठा फौजफाटाही या ठिकाणी दाखल झाला. तरीही जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी अखेर सौम्य लाठीहल्लाही पोलिसांना करावा लागल्यचे एका वरीष्ठ पोलीस अधिका:याने सांगितले.
दरम्यान, याबाबत रात्री उशिरा ठाण्याचे आमदार संजय केळकर हे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. कोणाही विरुद्ध तक्रार आली तर त्याची गय केली नसल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्ष्रक अनिल पोफळे यांनी सांगितले. दोन गटांमध्ये वाद उद्भवल्यानंतर पोलिसांनी आरडाओरडा करुन जमावाला पांगविल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून याठिकाणी राज्य राखीव दलांच्या तुकडीसह पोलिसांचा बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात केला आहे.