नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:14 PM2022-08-21T16:14:16+5:302022-08-21T16:14:33+5:30

''तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी..." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांन अधिवेशनात झापलं.

ShivSena chief Uddhav Thackeray praises Neelam Gore for giving harsh words to Gulabrao Patil | नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले...

नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं, उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंचं कौतुक केलं; म्हणाले...

googlenewsNext

मुंबई: सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना कडक शब्दात खडसावल्याचा प्रकार समोर आला. ''मंत्री असाल तुमच्या घरी...." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबरावांना झापलं. गोऱ्हेंच्या त्या कृतीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेचं कौतुक

नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन पार पडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना झापलं ते योग्यच केलं. सभागृहाची एक उंची आहे, तिथे कसं वागलं पाहिजे, याचे काही नियम आहेत. मंत्री असो वा कुणीही असो, सभागृहात आल्यावर त्याने शिस्तीत वागलं पाहिजे. विधिमंडळात शिस्तीचा आग्रह प्रत्येकाने पाळायला हवा, तुम्ही तो नेहमी पाळता आणि जे पाळत नाही त्यांना योग्य शब्दात खडसावताही. सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार", अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांचे कौतुक केले. 

ते पुढे म्हणाले की, "तो कोण होता, म्हणून तुम्ही त्याला खडसावलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तुम्ही ज्या पदावर बसलात त्याला न्याय देताना सभागृहाची उंची पाळून संबंधिताला योग्य शब्दात समज दिली गेलीच पाहिजे. अगदी उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले, मग तो कोणताही मुख्यमंत्री असो, तेव्हासुद्धा कान उघाडण्याचे काम तुम्हाला करावे लागणार आहे. सभागृहाची उंची पाळावीच लागणार, गैरवर्तनाला अजिबात थारा नाही,'' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

विधिमंडळात नेमकं काय झालं..?
"महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी 18 तारखेला शिक्षकांच्या निधीवरुन प्रश्न विचारला. यावेळी खाली बसून गुलाबराव पाटील काहीसे कुजबुजत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना समज दिली. त्यावर गुलाबरावांनी मला बोलायचं आहे, असं म्हणत हातवारे केले. उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका, असं म्हणत गुलाबरावांनी नीलम गोऱ्हे यांच्या दिशेने इशारा केला. त्यानंतर नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या. "तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता, मंत्री असाल तुमच्या घरी..." अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं

Web Title: ShivSena chief Uddhav Thackeray praises Neelam Gore for giving harsh words to Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.