शिवसेना 'कन्फ्यूज'; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत वैचारिक गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 06:51 PM2018-07-25T18:51:32+5:302018-07-25T18:52:02+5:30
भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे.
मुंबई - भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दल अत्यंत ठाम आणि जाज्ज्वल्य भूमिका होती. पण, उद्धव ठाकरे त्याबाबत संभ्रमात असल्याचं त्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमधून जाणवतं. त्याचप्रमाणे, काही धोरणं त्यांना पटत आहेत, पण केवळ मोदी सरकार ती राबवतंय म्हणून ते त्याला विरोध करताहेत, असंही प्रकर्षाने दिसतं.
'कृष्णाने गीता सांगितली, पण ती अमलात आणली आपल्या शिवाजी महाराजांनी', या वाक्याने उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला सुरुवात झाली होती. त्यातून शिवाजी महाराजांबद्दलचा आदर जाणवत होताच, पण गीतामाहात्म्यही अधोरेखित होत होतं. भगवद्गीतेचंच सार सांगणारा 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्याच दिवशी हा पहिला भाग प्रसिद्ध झाला होता. टिळकांबद्दल ठाकरे कुटुंबाला किती अभिमान आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु, भगवद्गीता वाटपाच्या प्रश्नावर उद्धव यांनी अगदीच गुळमुळीत भूमिका घेतली.
'हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून गीतेविषयी आदर राखायलाच हवा, पण देशात किंवा महाराष्ट्रात ज्या ‘कॉन्व्हेन्ट’ स्कूल्स आहेत तेथे गीता वाटणार आहात काय? भगवद्गीता वाचण्यापेक्षा तुम्ही शिक्षण व्यवस्था का सुधारत नाही? आधीच ज्या मुलांच्या पाठीवर दप्तराचे ओझे आहे त्या ओझ्यामध्ये गीतेचे ओझे का टाकता?', असे प्रश्न उद्धव यांनी मुलाखतीत विचारले आहेत. जी भगवद्गीता शिवाजी महाराजांनी आचरणात आणली, त्या गीतेचा खरं तर हिंदुत्ववादी शिवसेनेनं आग्रह धरला पाहिजे. बाळासाहेबांनी कदाचित गीतावाटपाचं समर्थन केलं असलं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
हिंदू सण आणि खास करून दही हंडी उत्सवासाठी शिवसेना अत्यंत आग्रही असते. शिवसेनेचे अनेक नेते आपापल्या भागात उंचच उंच हंड्याही उभारतात. पण, त्याच सेनेला श्रीकृष्णाची भगवद्गीता जड का वाटते?, असा प्रश्न काही सूज्ञ मंडळींनी केला आहे.
मी अयोध्येत जाऊन रामल्लाचे दर्शन घेणार आहे, वाराणसीत जाऊन गंगा आरतीत सहभागी व्हायचे आहे, असं सांगत त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडलाय. पण, कृष्णाच्या भगवद्गीतेला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय.
'वन नेशन वन इलेक्शन' ही कल्पना चांगली आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत मांडलंय. म्हणजे, ती प्रत्यक्षात येणं देशासाठी फायद्याचं असल्याचं त्यांना वाटतंय. पण त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केल्यानं उद्धव यांनी त्यातही खोड काढल्याचं दिसतं. सर्वांना एकदा मूर्ख बनवण्याची संधी म्हणून ते 'वन नेशन'वाले इलेक्शन बघताहेत का?, असा सवाल त्यांनी केलाय. त्यामुळे दोन वाक्यांमध्ये विरोधाभास दिसतोय.