मुख्यमंत्र्यांच्या खेळीने शिवसेना गोंधळलेली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2016 03:56 AM2016-11-03T03:56:14+5:302016-11-03T03:56:14+5:30
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले.
डोंबिवली : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला मंजुरी देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली, उल्हासनगर आणि कळवा, मुंब्रा आणि दिव्याला या सेवेतून वगळले. त्यामुळे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फडणवीस यांना साकडे घातले. प्रत्यक्षात खरेच त्यांनी डोंबिवलीत मेट्रोला हिरवा कंदील दिला आहे का, याबाबत त्यांच्याकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीमुळे शिवसेनेची अवस्था गोंधळल्यासारखी झाल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी केली.
मनसेने डोंबिवली मेट्रोची मागणी केल्यावर डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर तातडीने ठाण्यात पत्रकार परिषद घेत त्याबद्दलची माहिती दिली. मात्र, काही मुद्दे सांगायचे राहून गेल्याचे सांगत त्यांनी पुन्हा कल्याणला पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोला मुंब्रा, कळवा-दिवा जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे सादरीकरण एमएमआरडीएकडे केले. या प्रकाराला गोंधळ नाहीतर अजून काय म्हणावे, असा सवाल पाटील यांनी केला. त्यांनी दिलेल्या कल्याण-शीळ उन्नत मार्गाच्या आश्वासनाचे काय, मध्यंतरी कल्याण-शीळ रोडवर अंडरपासची संकल्पना आणली, त्याचे काय? उद्या अजून कोणी सेनेतून पुढे येऊन नवीन मेट्रो मार्गाची मागणी करेल, सर्वांना प्रत्येकाच्या दारातून मेट्रो गेली पाहिजे असेही वाटेल. परस्पर विरोधी प्रतिक्रिया द्यायला सांगून मनसेने केलेल्या डोंबिवली मेट्रो मागणीबाबत लोकांमध्ये गोंधळ तयार करण्यासाठी ठाण्याहून बोलते केलेले हे पोपट आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.