शिवसेना ही काँग्रेसची ‘बी टीम’! नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:29 AM2017-10-10T03:29:19+5:302017-10-10T03:29:36+5:30
खासदार अशोक चव्हाण यांच्या इशा-यावर नाचणारी शिवसेना ही काँग्रेसची ‘बी टीम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सोमवारी केला.
नांदेड : खासदार अशोक चव्हाण यांच्या इशा-यावर नाचणारी शिवसेना ही काँग्रेसची ‘बी टीम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सोमवारी केला. महानगरपालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेवर थेट हल्ला चढवित मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी नांदेडमध्ये प्रचारसभा घेतली. याच शिवसेनेने औरंगाबादसह राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या मनपा निवडणुकीत काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. येथेही तोच प्रकार सुरू आहे. मुळात सेना येथे स्पर्धेतच नाही. उद्धव ठाकरेंना नांदेडमध्ये दोन आकडी उमेदवार विजयी करता येणार नाहीत, याची खात्री बाळगा.
यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर उपस्थित होते.
काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, मागील वीस वर्षे तुम्ही काँग्रेसला एकहाती सत्ता दिली. गुरू-ता-गद्दीच्या माध्यमातून अडीच हजार कोटींचा निधी मिळाला.
मात्र या कामातही गैरव्यवहार केल्याने शहराची स्थिती जैसे थे राहिली. नांदेडमध्येही परिवर्तन
घडवा; शहराचा कायापालट
करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला नांदेडचे पाणी देणार
अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोदावरी नदीत आज १९ नाल्याद्वारे अस्वच्छ पाणी सोडल्याने या नदीची दुरवस्था झाली आहे.
या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीही नांदेडमध्ये उपक्रम राबविला जाईल आणि प्राप्त
होणारे शुद्ध पाणी परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला देण्यात येईल. यामुळे गोदावरीचे पावित्र्यही राखण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या-
नांदेड-वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान तर १२ रोजी मतमोजणी होणार आहे़ सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या़ गेल्या बारा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती़ राज्यभरातील दिग्गज नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या़
त्यामध्ये काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आ़ भाई जगताप, शायर इम्रान प्रताप गढी, आ़ अब्दुल सत्तार यांच्यासह पक्षाचे ४० दिग्गज नांदेडात होते़ तर भाजपानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मंत्र्याची मोठी फौज उतरविली होती़
शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरणमंत्री रामदास कदम, आ़ निलम गोºहे व अन्य नेते नांदेडात तळ ठोकून होते़ राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते आ़ धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशिवाय राष्ट्रवादीचा दुसरा मोठा नेता नांदेडात फिरकला नाही़
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन हे एका गुन्ह्यात तुरुंगात असल्यामुळे खा़असदोद्दीन ओवैसी यांच्यावर प्रचाराची धुरा होती़