Shivsena Dasara Melava 2021: 'त्यांना' भाजपचं ब्रँड ऍम्बेसेडर करा; ठाकरेंचा सणसणीत टोला; थेट जाहिरातची वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 07:27 PM2021-10-15T19:27:54+5:302021-10-15T19:31:00+5:30
Shivsena Dasara Melava 2021: उद्धव ठाकरेंकडून भाजपचा समाचार; मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळ्यांवर टीका
मुंबई: आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आमचा आवाज दाबवणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून (Shivsena Dasara Melava 2021) विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आज काही जण केवळ माझं भाषण संपण्याची वाट पाहताहेत. भाषण कधी थांबतंय आणि कधी एकदा चिरकतोय, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणं, चिरकणं यातूनच त्यांना रोजगार मिळतो, असा टोला ठाकरेंनी लगावला.
हर्षवर्धन पाटलांचं विधान अन् मुख्यमंत्र्यांचं शरसंधान
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलं. भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. त्यांना भाजपनं ब्रँड ऍम्बेसेडर करायला हवं. काही जाहिराती असतात ना, तशी त्यांची आजची स्थिती आहे. आधी मला झोप यायची नाही. मग कोणीतरी सांगितलं भाजपमध्ये जा. आता मी कुंभकर्णासारखा झोपतो. दरवाजे कितीही वेळा ठोकला तरी उठत नाही, अशी काहींची आजची अवस्था आहे. ही काय लायकीची माणसं घेतली आहेत भाजपनं?, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
स्वत:च्या हिमतीवर आव्हानं द्या; मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले
कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात, असं ठाकरे म्हणाले.