Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; दीपाली सय्यद यांचं मोठं विधान, मानले भाजपाचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 07:50 AM2022-07-17T07:50:36+5:302022-07-17T08:00:21+5:30
Shivsena Deepali Sayed And Eknath Shinde, Uddhav Thackeray : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आता मोठं विधान केलं आहे.
मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार असं म्हटलं आहे.
दीपाली सय्यद (Shivsena Deepali Sayed) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून य़ाबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद असं म्हणत भाजपाचे देखील आभार मानले आहेत. "येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं. शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
@OfficeofUT
— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
@mieknathshinde
@TawdeVinod
@Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma
दीपाली सय्यद यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार का? आणि या भेटीनंतर नेमकं काय होणार? य़ाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील दीपाली यांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये "मला एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील. पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव साहेब आणि शिवसेनेवर टीका करतील. तर त्यांना एवढंच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे" असं म्हटलं होतं.
"उगाच कळ काढू नका. शिंदे साहेबांनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजपा आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. परंतू वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे" असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं होतं. तसेच "काहीजण म्हणतात आदरणीय उद्धवसाहेब जिंकले तर काहीजण बोलतात आदरणीय शिंदेसाहेब जिंकले. यासर्व घटनेत शिवसैनिक हरला, त्याला कळत नाही की ही भूमिका शिवसेनेची किती. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शिवसैनिकाला सांभाळावे आणि हे राजकारण संपवून शिवसेनेचे समाजकारण सुरू करावे. जय महाराष्ट्र" असंही दीपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.