मंदिरप्रश्न हाती घेण्याची शिवसेनेची क्षमता नाही, विहिंपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 05:52 AM2018-11-12T05:52:18+5:302018-11-12T05:52:50+5:30
विहिंपची टीका : आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा
मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या मुद्दयावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या, त्यासाठी ‘श्रीराम’ लिहिलेल्या विटा घेत अयोध्येचा दौरा आखणाºया शिवसेनेला विश्व हिंदू परिषदेने फटकारले आहे. हा प्रश्न हायजॅक करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला असला, तरी तेवढी शिवसेनेची क्षमता नाही, अशी टीका रविवारी त्यांच्या नेत्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे आणि त्यानंतरच राम मंदिराच्या मुद्दयाला हात घालावा, असे टोला लगावतानाच शिवसेना मंदिराच्या मुद्दयावर राजकारण करत असल्याचाही आरोप विहिंपने केला आहे. या आंदोलनात उतरून ते ताब्यात घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोपही विहिंपच्या नेत्यांनी केल्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर संघ परिवारातील संघटना शिवसेनेसोबत जाण्यास तयार नसल्याचे दिसून आले.
राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेने सुरूवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याची घोषणा करत हा मुद्दा तापवला. त्यासाठी शिवसेनेच्या शाखा-शाखांत तयारी सुरू आहे. सुरूवातीला या मुद्द्यावर शिवसेनेला फटकारणाºया रा. स्व. संघानेही नंतर हिंदुत्त्व आणि मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
या पार्श्वभूमीवर विहिंपचे आंतराष्ट्रीय अध्यक्ष, माजी न्यायमुर्ती विष्णू कोकजे यांनी रविवारी शिवसेनेला चिमटा काढला. ‘शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, हा विषय हायजॅक करण्याइतकी शिवसेनेची शक्ती-क्षमता नाही. शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधून दाखवावे. त्यानंतरच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या प्रश्नाला हात घालावा,’ अशी तिरकस प्रतिक्रिया कोकजे यांनी दिली.
अयोध्येत शिवसेना रॅली काढणार आहे. पण शिवसेनेला इतक्या वर्षानंतर अचानक राम मंदिराचा मुद्दा कसा काय आठवला, असा प्रश्न करून कोकजे म्हणाले, अयोध्येत शिवसेनेची अशी किती ताकद आहे? मुंबईत उत्तर भारतीयांना मारझोड करायची आणि अयोध्येत राम मंदिरावर आंदोलन छेडायचे, हा शिवसेनेचा राजकीय सोयीचा खेळ आहे. न्यायालयीन निकालांची आणि प्रक्रियांची किती दिवस वाट पाहणार? राम मंदिरासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणीही कोकजे यांनी केली.
‘हा तर विहिंपचा मूर्खपणा’
शिवसेनेने मात्र विहिंपच्या या भूमिकेची ‘शुद्ध मूर्खपणा’ अशी संभावना केली आहे. विहिंपची ही वक्तव्ये, भूमिका म्हणजे मूर्खपणा आहे. त्यावर कसलीही प्रतिक्रिया द्यावी, अशी स्थिती नाही. त्यामुळे आमचे यावर ‘नो कमेंट’च असेल, असे पक्षाचे प्रवक्ता आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले.