शिवसेनाप्रमुखांनी 'या' मुस्लीम आमदाराला दिली होती 'शिवभक्त' उपाधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 01:59 PM2019-07-03T13:59:45+5:302019-07-03T14:10:21+5:30
ज्या प्रमाणे ते रमजान ईद किंवा मोहरम साजरे करत असे, त्याच भक्तीने मारुतीच्या मंदिरात मूर्तीसमोर नतमस्तक होऊन नारळ फोडणारे साबीर भाई महाराष्ट्राने पाहिले आहे.
मुंबई – शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत आलेला मुस्लीम तरुण पुढे आमदार होते आणि शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागासह खेडोपाडी नेण्यात सिंहाचा वाटा उचलतो. मूळच्या नारायणगावच्या (जि. पुणे) असलेले शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार साबीर शेख यांना शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जात असे. शिवसेनेतील एकमेव मुस्लीम नेता, अशीही साबीर शेख यांची ओळख होती. तर शिवसेनाप्रमुखांनी साबीर शेख यांना 'शिवभक्त' ही उपाधी दिली होती.
शिवसेनेच्या स्थापनेपासून अखेर पर्यंत एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिवसेनेचा मुस्लीम चेहरा अशी ओळख असलेला नेता म्हणजे साबीर शेख होते. वडील प्रवचनकार असल्याने साबीर शेख यांना सुद्धा संतवाड्मयाची गोडी होती. अंबरनाथ मतदारसंघातून निवडून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत गेले. तेथे १९९१ ते २००४ असे १५ वर्षे ते आमदार होते. युती सरकारच्या काळात ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुद्धा झाले. बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. शिवसेनाप्रमुख यांनी साबीर शेख यांना 'शिवभक्त' ही उपाधी दिली होती.
साबीर भाई या नावाने त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखत असे. ज्या प्रमाणे ते रमजान ईद किंवा मोहरम साजरे करत असे, त्याच भक्तीने मारुतीच्या मंदिरात मूर्तीसमोर नतमस्तक होऊन नारळ फोडणारे साबीर भाई महाराष्ट्राने पाहिले आहे. रोजा आणि चतुर्थीचा उपवास त्यांच्यासाठी एक सारखेच होते. मात्र पंधरा वर्षे आमदार आणि पाच वर्षे मंत्री असलेल्या साबीर शेख यांची मालमत्ताही नव्हती आणि शिल्लकही नव्हती त्यामुळेच त्यांना उत्तरायुष्यात कदाचित वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली. सध्याच्या राजकारणात असा खरा लोकसेवक मिळणेही दुर्मीळ झाले आहे हे विशेष.