शिवसेनेला कदापि पाठिंबा नाही
By Admin | Published: February 16, 2017 12:22 AM2017-02-16T00:22:41+5:302017-02-16T00:22:41+5:30
शिवसेनेने यदा कदाचित पाठिंबा काढून घेतला आणि पर्यायी व्यवस्था झाली, तर त्यात काँग्रेस असणार नाही़ काँग्रेस कुठल्याही परिस्थितीला
पुणे : शिवसेनेने यदा कदाचित पाठिंबा काढून घेतला आणि पर्यायी व्यवस्था झाली, तर त्यात काँग्रेस असणार नाही़ काँग्रेस कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे, परंतु शिवसेनेला कदापि पाठिंबा देणार नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला़
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते पुण्यात आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते़ चव्हाण म्हणाले, मंत्रिमंडळातून शिवसेना बाहेर पडेल का, असे विचारले जात आहे़ ही शक्यता कमी आहे़ कितीही अपमान झाला, तरी सत्तास्थान सोडण्याची त्यांची तयारी नाही़ शेवटी त्यातून त्यांना काहीतरी पदरात पाडून घ्यायचे आहे़ ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले, तर कोणीतरी सरकारवर अविश्वास ठराव आणावा लागतो़ भाजपानंतर मोठा पक्ष म्हणून शिवसेनेची ती जबाबदारी आहे़ गेल्या अडीच वर्षात केंद्र व राज्य सरकारने काय काम केले, याची चर्चा होऊ नये़ भाजपाचे अपयश झाकले जावे, यासाठी भाजपाने मुद्दाम ही रणनिती आखली असून, लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यात येत आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.