बँकेच्या रांगेतील नागरिकांसाठी शिवसेनेने केली चहापानाची सोय
By admin | Published: November 12, 2016 05:49 PM2016-11-12T17:49:52+5:302016-11-12T17:49:52+5:30
चलनातून पाचशे-हजारच्या नोटा बाद ठरविण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे भाजपाकडून गुणगान सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेने..
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १२ - चलनातून पाचशे-हजारच्या नोटा बाद ठरविण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे भाजपाकडून गुणगान सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेने शहरात ठिकठिकाणी बँकासमोर रांगा लावून तासनतास उभे राहिलेल्या नागरिकांसाठी मोफत चहापानाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकाही तैनात ठेवली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचा समाचार घेतल्यानंतर महानगर शिवसेनेने शनिवारी शहरात सुमारे ३५ ठिकाणी सेवाकेंद्र उभे करत भाजपाला एकप्रकारे खिजविण्याचाच प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू आहे.
बाद ठरलेल्या पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील सर्व बँकासमोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत. एकीकडे नागरिक बँकासमोर रांगा लावून नोटा बदलण्याच्या चिंतेत असताना मोदी सरकारच्या निर्णयाचे भाजपा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी स्वागत व जल्लोषही केला जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सतावणारया या निर्णयाचा समाचार घेतल्यानंतर आणि राज्यात दोन ठिकाणी बँकसमोर रांगेत उभे असलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना लक्षात घेऊन नाशिक महानगर शिवसेनेने शनिवारपासून शहरातील विविध प्रमुख बँकासमोर ‘सेवाकेंद्र’ उभे करत रांगेत उभे असलेल्या नागरिकांच्या मोफत चहापानाची सोय केली आहे. सोबतच बिस्किट आणि चॉकलेटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, ठिकठिकाणी रुग्णवाहिकाही तैनात ठेवल्या आहेत.