..तर त्याचा परिणाम देशाच्या लोकशाहीवर जास्त होईल; भास्कर जाधवांचा प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 04:19 PM2022-09-07T16:19:33+5:302022-09-07T16:19:54+5:30
वर्षानुवर्षे जो आकस होता तो शाह यांच्या रुपाने बाहेर पडला. महाराष्ट्राला अमित शाह यांनी आव्हान दिलंय असं भास्कर जाधवांनी म्हटलं.
मुंबई - उद्धव ठाकरेंचे सरकार ज्या विश्वासघातानं पाडले गेले त्यानंतर ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली. हे प्रकरण शिवसेनेशी संबधित असलं तरी त्याचा परिणाम देशातील लोकशाहीवर होईल. देशातल्या राज्यघटनेवर, पक्षांतर्गत कायद्यावर होईल. न्यायाने, नीतीमत्तेने आणि कायद्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला पाहिजे. परंतु दुर्देवाने काही उलटा निर्णय लागला तर त्याचा परिणाम शिवसेनेवर कमी आणि देशातील लोकशाहीवर जास्त होईल अशी भीती शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
भास्कर जाधव म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे विविध परिणाम पाहायला मिळतील. परंतु वेळ लागेल मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निकाल लागेल. निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा ही शिंदे गटाची मागणी कशाच्या जीवावर आहे? मूळ शिवसेनेतील ४० आमदार विश्वासघातानं बंडखोरी केली म्हणून ते पक्षावर दावा करतात. या महाराष्ट्रात एकच आमदार असलेला पक्ष आहे. तो आमदार बाहेर पडला आणि म्हणाला हा पक्ष माझा आहे असं होत नसतं. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत जो गट वेगळा झाला आहे त्याला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल किंवा आमदारकी रद्द होईल हीच कायद्यातील तरतूद आहे. त्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्याचा प्रकार आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच आगामी निवडणुका नोव्हेंबरमध्ये झाल्या तर शिवसेनेच्या दृष्टीनं धनुष्यबाण चिन्ह महत्त्वाचं आहे. शिवसेनेने जेव्हापासून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हे आमचं चिन्ह आहे. चिन्हाचा जो काही निर्णय व्हायचा तेव्हा होईल. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राला येऊन संपूर्ण महाराष्ट्रालाच आव्हान दिले आहे. १०६ हुतात्मे महाराष्ट्राने देऊन मुंबई मिळवली. ते जिंकण्याचं स्वप्न गेली अनेक वर्ष पाहत असल्याचं शाह यांनी सांगितले. वर्षानुवर्षे जो आकस होता तो शाह यांच्या रुपाने बाहेर पडला. महाराष्ट्राला अमित शाह यांनी आव्हान दिलंय. त्यामुळे चिन्ह जेवढं महत्वाचं तेवढी मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहणं महत्त्वाचं आहे असं भास्कर जाधवांनी सांगितले.
दसरा मेळावा बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेच घेतील
गेल्या ५०-६० वर्षाचा इतिहास घडवणारे, सांगणारे लोक आजही महाराष्ट्रात आहेत. शिवाजी पार्क, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाते सभा घेण्यापुरते नाही. दसरा मेळावा ऐतिहासिक आहे. हे नातं तोडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. दसरा मेळाव्याची सुरुवात शिवाजी पार्कातून झाली. त्यामुळे तिथेच आमचा मेळावा होईल. शिवसेनेला दुसरी जागा सुचवणाऱ्यांनी स्वत: त्या जागेवर मेळावा घ्यावा आणि शिवसेनेची ही परंपरा मोडू नये अशी शिवसेना नेते भास्कर जाधवांनी विनंती केली.
जे निष्ठेने, आपुलकीने राहतील ते आमचे
कुणाला थांबवायचं असतं तर मी तेव्हाच थांबवू शकत होतो. परंतु जे प्रेमाने, निष्ठेने, आपलेपणाने शिवसेनाप्रमुखांसोबत थांबणारे जे कुणी असतील त्यांनी राहावे. ज्यांना जायचं असेल त्यांच्याशी दार उघडं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या संपर्कात कोण याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही जाधवांनी म्हटलं.