'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 07:09 PM2021-12-09T19:09:08+5:302021-12-09T19:09:28+5:30
'आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे.'
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या फोटोवरुन भाजप नेते आणि ट्रोलर्स राऊतांवर टीका करत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन आपली प्रतिक्रीया दिली. 'संजय राऊत यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभे राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे.मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे.'
नमन @rautsanjay61#sanskar#Sanskari#Sanskrutipic.twitter.com/ZGZUaUKY4C
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 9, 2021
‘वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर आपणही त्यांना बसायला जागा देतो. मग तो कोण माणुस आहे, हे पाहत नाही. संजय राऊत यांनीही तेच केलं. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल संजय राऊतांना माहित आहे. त्यामुळेच त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली. संजय राऊत यांचे आभार मानतो आणि त्यांना नमन करतो’, असंही जितेंद्र आव्हाड व्हिडीओमध्ये म्हणाले.
काय तक्रार करायची ती करा; संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा
शरद पवारांना खुर्ची दिल्यामुळे संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी टीकाकारांना '**या' असा शब्द वापराल होता. त्यानंतर भाजपने त्यावर आक्षेप घेऊन राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, या अशिक्षित आणि अडाणी लोकांना काही कळत नाही.
हे लोक हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात, पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले तर मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख असा आहे, असं राऊत म्हणाले. मी दिल्लीत आहे, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात असतो तर कदाचित हा शब्द नसता वापरला. पण इथली ती बोलीभाषा आहे, त्यामुळे सर्वांना समजेल उमजेल असा शब्द वापरला. तो शब्द योग्यच, कुणाला काही तक्रार करायच्या असतील तर कराव्यात, असं ते म्हणाले.