"राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 02:59 PM2022-06-01T14:59:39+5:302022-06-01T15:00:31+5:30

Sanjay Raut : शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Shivsena Leader Sanjay Raut Give Political Advice To Sambhajiraje Chhatrapati In Pune | "राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

"राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

Next

पुणे : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढायची तयारी दर्शविली होती. मात्र, कोणत्याच पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत शिवसेनेच्या भूमिकेविषयी नाराजीही व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर राजकारणात चढ-उतार येत असतात, ते पचवता आले पाहिजेत, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना दिला आहे. संजय राऊत हे पुण्यात बोलत होते. 

पुण्यात नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला बुधवारी संजय राऊत यांनी हजेरी लावली. यावेळी राजाला फक्त प्रजा असते, समर्थक नाही. संभाजीराजे, आपण राजकारणात आहात, चढ-उतार येत असतात, ते पचवता आले पाहिजेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ईडीचा वापर होईल, अशी भीती अनेकांना वाटत आहे. कोणी कितीही घोडे उधळू द्या. पण शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.

याचबरोबर, दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केलेल्या कारवाईबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, देशात जे चाललेलं आहे, ते लोकशाहीला पुरक नाही. सत्येंद्र जैन हिमाचलचे प्रभारी म्हणून तयारी करत होते. त्यामुळे भाजपला प्रॉब्लेम होईल म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले. जे भाजपच्या विरोधात उभे राहतील त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात. सत्येंद्र जैन यांना अटक झाली, त्यावर केजरीवालही बोलले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा दबावाचे राजकारण सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

सगळ्या संकटात आमची लोकं टिकून राहिली. आपण टिकून राहिलो म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. उडून गेलेल्या कावळ्यांमुळे नव्हे तर तुमच्यासारख्या मावळ्यांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, आम्हालाही हनुमान चालीसा म्हणता येते. पण लोकांचे प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत. रस्ते, रोजगार आणि पाणी ही सगळी कामं शिवसेनेचे नगरसेवकच करतात. आम्ही फक्त राजकारण करत नाही. आपण भोंगे लावून सांगत नाही. पण आता आपणही भोंगे लावून आपण पाच वर्षांत काय काम केले, हे सांगायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Web Title: Shivsena Leader Sanjay Raut Give Political Advice To Sambhajiraje Chhatrapati In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.